अंबाबाईची दशमहाविद्या रूपात पूजा

0
128
https://www.youtube.com/watch?v=5PvzMfJeiVc&t=75s
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

देशातील ५१ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आज, सोमवार पासून मंगलमयी वातावरणात प्रारंभ झाला. सोमवारी पहाटे काकड आरती आणि पहिला अभिषेक झाल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता मुनिश्वर घराण्यातील श्रीपूजकांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. तोफेच्या सलामीने देवीचे घट बसले आणि उत्सवाची विधिवत सुरुवात झाली.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची कमळात बसलेल्या लक्ष्मी रूपातील विशेष पूजा बांधण्यात आली. यंदा संपूर्ण उत्सवात अंबाबाईची दशमहाविद्या रूपातील विविध स्वरूपांत पूजन होणार असून, पहिल्या दिवशी देवीच्या कमलालक्ष्मी या रूपाची भक्तिपूर्वक आराधना करण्यात आली.

कमलालक्ष्मी या दशमहाविद्येतील दहाव्या देवतेचे स्वरूप अतिशय मोहक आहे. सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती असलेल्या या देवीच्या दोन्ही हातात कमळ असून खालचे दोन्ही हात वरदायक व अभय देत आहेत. देवी कमळात विराजमान असून तिच्या सभोवताली हत्तींची उपस्थितीही दर्शविली जाते. पुराणकथेनुसार, देव व असुरांनी समुद्र मंथन केल्यावर मार्गशीर्ष अमावस्येला सर्वप्रथम प्रकटलेले देवतारत्न म्हणजे श्री कमलालक्ष्मी होय. त्यानंतर अन्य तेरा रत्ने प्रकट झाली. कमला, लक्ष्मी, दशमी, गजलक्ष्मी, गजेंद्रलक्ष्मी या विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या देवीच्या उपासनेने दारिद्र्य, दु:ख, शोक व दुर्भाग्य नष्ट होऊन सुख-सौभाग्य, यश आणि उन्नती लाभते, अशी श्रद्धा आहे.

देशभरातील लाखो भाविक दरवर्षी या काळात करवीर नगरीत येऊन अंबाबाईच्या दर्शनाचा लाभ घेतात. मंदिर परिसरात सकाळपासूनच गजर, ढोल-ताशे, फुलांची सजावट आणि देवीच्या जयघोषांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
———————————————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here