नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” परीक्षा पे चर्चा ” या लोकप्रिय उपक्रमाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. एका महिन्यात सर्वाधिक नोंदणी मिळवणाऱ्या नागरिक सहभागी प्लॅटफॉर्मच्या स्वरूपात या उपक्रमाची नोंद झाली असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना परीक्षेच्या तणावापासून मुक्त करण्याचा उद्देश असलेल्या ” परीक्षा पे चर्चा ” या उपक्रमात देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संवादामुळे केवळ तणाव नाहीसा होत नाही, तर पंतप्रधानांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि दिशा देखील मिळते.
विशेष बाब म्हणजे, मोदी सरकारच्या आतापर्यंत चार उपक्रमांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळाले असून, त्यातील दोन उपक्रम केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राबवले गेले आहेत.
याआधी २०१५ मध्ये जेव्हा धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री होते, तेव्हा ‘पहल’ (LPG साठी थेट लाभ हस्तांतरण) योजनेला १२.५७ कोटी कुटुंबांना लाभ देत जगातील सर्वात मोठा रोख हस्तांतरण कार्यक्रम म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद मिळाली होती.
त्याचप्रमाणे २०१५ मधील आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि प्रधानमंत्री जन धन योजना या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांनाही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मान्यता मिळाली आहे.
या सर्व गोष्टींतून एक गोष्ट स्पष्ट होते पंतप्रधान मोदींचं नेतृत्व आणि सरकारचं व्हिजन हे जागतिक स्तरावर नवनवीन मान्यता प्राप्त करत आहे. या यशामध्ये मूलभूत आणि शांतपणे काम करणाऱ्या सर्वच घटकांचा ही मोठा वाटा आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून ते सरकारच्या धोरणांना यशस्वीपणे अंमलात आणत आहेत.
आजच्या घडीला, धर्मेंद्र प्रधान मोदी सरकारच्या दूरदृष्टीचा विश्वासार्ह चेहरा ठरत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच “परीक्षा पे चर्चा”सारखा उपक्रम जगातही उठून दिसतो आहे. गिनीज बुकमधील ही नोंद हे केवळ एका कार्यक्रमाचं नव्हे, तर सरकारच्या कार्यक्षमतेचं जागतिक स्तरावरील मान्यतेचं प्रतिक आहे.
——————————————————————————————————