नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
क्रिकेटप्रेमींसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ च्या दुसऱ्या पर्वाचं औपचारिक घोषणा नुकतीच करण्यात आली असून, यंदाही ही स्पर्धा चांगलीच रंगणार आहे. गतवर्षी भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा पराभव करत जेतेपद पटकावलं होतं. यंदा देखील भारताचं लक्ष जेतेपद कायम राखण्यावर आहे.
दमदार भारतीय संघ जाहीर
यंदाच्या पर्वात भारतीय संघाचं नेतृत्व भारताचा स्टार अष्टपैलू युवराज सिंग करणार आहे. संघात अनेक अनुभवी आणि नव्याने पदार्पण करणारे खेळाडू आहेत, जे मैदानावर तुफान खेळी साकारण्यास सज्ज आहेत.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे : युवराज सिंग (कर्णधार), शिखर धवन, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंग, पीयूष चावला, स्टुअर्ट बिन्नी, गुरकीरत सिंग मान, विनय कुमार, सिद्धार्थ कौल, वरुण आरोन, पवन नेगी.
यंदाच्या पर्वात शिखर धवन आणि रॉबिन उथप्पा हे दोन खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये खेळताना दिसतील. त्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजीला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.
मागील पर्वातील कामगिरी
भारताने २०२४ मध्ये झालेल्या पहिल्या पर्वात साखळी फेरीत मिश्रित कामगिरी केली होती. पाच सामन्यांपैकी दोन सामने जिंकताना तीन सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. मात्र गुणतालिकेत चौथे स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली होती.
उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्स संघाचा तब्बल ८६ धावांनी पराभव केला होता.
अंतिम सामन्यात, भारताने पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा पाच विकेट्सने पराभव करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं.
यंदाच्या पर्वातील भारतीय संघाचे सामने
-
२० जुलै : पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध
-
२२ जुलै : दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सविरुद्ध
-
२६ जुलै : ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सविरुद्ध
-
२७ जुलै : इंग्लंड चॅम्पियन्सविरुद्ध
-
२९ जुलै : वेस्ट इंडिज चॅम्पियन्सविरुद्ध
३१ जुलै रोजी दोन्ही उपांत्य फेरीचे सामने, तर २ ऑगस्ट रोजी भव्य अंतिम सामना रंगणार आहे.
भारतीय संघाकडे अनुभव आणि ताकदवान फलंदाज, गोलंदाजांचा संगम आहे. युवराज सिंगसारख्या नेतृत्वाखाली भारताकडून पुन्हा एकदा विजयी कामगिरीची अपेक्षा असून, मैदानावर अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. भारतीय संघाला पुन्हा विजयी ठरवण्यासाठी आता सर्वांची नजर या सामन्यांवर असेल.
——————————————————————————————



