कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून ओळखला जातो. ज्याला जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस किंवा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस म्हणूनही ओळखले जाते, हा वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइटला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारे आयोजित केलेला वार्षिक कार्यक्रम आहे.
पहिला जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल १९९५ रोजी साजरा करण्यात आला आणि त्या दिवसा पासून तो ओळखला जातो. युनायटेड किंग्डम आणि आयर्लंडमध्ये संबंधित कार्यक्रम मार्चमध्ये साजरा केला जातो. २०२३ मध्ये, घानाची राजधानी अक्राला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून नियुक्त करण्यात आले. दरवर्षी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन भारतातही साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्याचे स्मरण केले जाते.
त्यानिमित्त एक विशेष कविता…
पुस्तक केव्हाही चांगलं
त्याला ना इंटरनेट ची गरज असते
ना बॅटरी संपण्याची भिती.
नको असतो त्याला ईयरफोन
की नको नेटपॅक ची लाचारी.
पुस्तकात सेव्ह डिलीट ची
सोय नसते.
पुस्तक डायरेक्ट रजिस्टर
होत असतं मेंदूत.
सोशल मीडिया वर
भाव खायला
पुस्तकंच कामी येतं
पुस्तक टॅग करत नाही
पुस्तक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नाही
पुस्तक ब्लॉक करत नाही की
पुस्तक शिवी घालत नाही.
पुस्तक बेवफा ही नसतं
जुन्या प्रेयसी सारखं.
पुस्तक पुरवतं सगळं लाड
म्हाताऱ्या आई सारखं
पुस्तक शिळं होत नाही
पुस्तक देता येतं
पुस्तक घेता येतं.
पुस्तक जपून ठेवतं
गुलाबाचं काळवंडलेलं फुल
पुस्तक जपून ठेवतं
पिंपळाचं झिरलेलं पान.
पुस्तक फाटलं तरी रडत नाही
पुस्तक नटलं तरी हसत नाही
पुस्तक कधी बिघडत नाही
हो
पुस्तक कधी मरत नाही.
| सुधीर जाधव
————————————————————————————–