मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
खासगी क्षेत्रातील कामगारांच्या कामकाजाच्या वेळेत मोठा बदल होण्याची शक्यता असून, राज्य सरकार दैनंदिन कामाचे कमाल तास नऊवरून दहा करण्याचा विचार करत आहे. राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतची माहिती दिली.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामगार विभागाने हा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव अमलात आणण्यासाठी महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना ( रोजगार नियमन आणि सेवा अटी ) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करावी लागणार आहे. सध्या या कायद्यांतर्गत राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मनोरंजन केंद्रे आणि विविध खासगी व्यवसायांसाठी कामाचे तास व सेवा अटी ठरवल्या जातात. सरकारच्या मते, या सुधारणा आंतरराष्ट्रीय कामगार नियमांच्या अनुरूप असतील आणि कार्यस्थळांना अधिक लवचिकता देतील.
महत्त्वाचे बदल
-
दैनंदिन कामाचे तास वाढणार : सध्याचे नऊ तासांचे कामकाज दहा तास करण्याचा प्रस्ताव.
-
ओव्हरटाइमची मर्यादा वाढणार : सध्या तीन महिन्यांत १२५ तास ओव्हरटाइमची मर्यादा आहे. ती वाढवून १४४ तास करण्याचा विचार आहे.
-
अनिवार्य ब्रेकची तरतूद : कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कामाच्या वेळेत अनिवार्य ब्रेकची तरतूद करण्याचा प्रस्ताव.
-
महिलांना रात्री कामाची संधी : नव्या कामगार संहितेनुसार महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची परवानगी देण्याचा विचार, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील.
-
लहान आस्थापनांचा समावेश : सध्या १० कर्मचाऱ्यांपर्यंतची आस्थापने या कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत. नवीन प्रस्तावानुसार २० कर्मचाऱ्यांपर्यंतची आस्थापने यात समाविष्ट केली जातील.
फुंडकर यांनी स्पष्ट केले की, हा विषय अद्याप चर्चेच्या प्रारंभिक टप्प्यात आहे. अनेक खासगी संस्थांमध्ये आधीच ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त तास काम करवून घेतलं जातं आणि त्यासाठी योग्य मोबदला दिला जात नाही, हे पाहता सरकारने हा पुनर्विचार सुरू केला आहे. मात्र, अंतिम निर्णय पुढील चर्चेनंतरच घेतला जाणार आहे.
———————————————————————————————–



