नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
क्रिकेटविश्वात एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात येणार असून, येत्या ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्व अंपायर आणि मॅच रेफरी महिला असणार आहेत. ही बाब केवळ या स्पर्धेच्या नव्या ओळखीचा भाग नाही, तर महिला सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
या स्पर्धेत पहिल्यांदाच प्रत्येक सामन्याचे संचालन महिला अंपायर आणि महिला मॅच रेफरी करणार आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिलांना अधिक संधी मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वासही उंचावेल. घोषित पॅनेलमध्ये भारतातील तीन महिला निवडल्या गेल्या आहेत. जीएस लक्ष्मी मॅच रेफरी असतील, तर वृंदा राठी आणि गायत्री वेणुगोपालन अंपायर म्हणून काम पाहतील.
स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंका मिळून करत असून, विविध सामने मुंबई, बेंगळुरू, कोलंबो आणि गाले या प्रमुख शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.
महिला अंपायर आणि मॅच ऑफिशियल्सचा हा पॅनेल जाहीर करताना आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितलं, “हा क्षण महिला क्रिकेटच्या प्रवासातील ऐतिहासिक टप्पा आहे. क्रिकेटमध्ये लिंगभेद न ठेवता नेतृत्व व प्रभाव सिद्ध करता येतो, हे या निर्णयातून दिसून येतं. यामुळे नव्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि अधिकाधिक महिला अंपायरिंगकडे वळतील.” शाह यांनी पुढे म्हटलं, “हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नाही, तर दृश्यता, संधी आणि आदर्श घडवण्याबद्दल आहे. याचा प्रभाव या स्पर्धेपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर दिसेल.”
या उपक्रमामुळे महिला पंचगिरी आणि रेफरी क्षेत्रात अधिक महिला तयार होतील, आणि भविष्यात पुरुषांच्या सामन्यांतही महिलांना अंपायरिंग करण्याच्या संधी मिळतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
———————————————————————————————-



