कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अनेक विधानांनी वादग्रस्त ठरलेले तसेच मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं अजित पवार राष्ट्रवादी गटाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे येत्या सोमवारी राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मंगळवारी कॅबिनेटची बैठक आहे, त्यापूर्वी माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता आहे.
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही मंत्र्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर आले आहेत, या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये २५ मिनिटं चर्चा झाली, ही चर्चा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे, मात्र या चर्चेबाबत अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही. फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
छावा संघटनेचे नेते विजय घाडगे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेतला जाईल असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचा दावा विजय घाडगे यांनी केला आहे. तसेच सूरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचंही अजित पवार यांनी यावेळी म्हटल्याची माहिती विजय घाडगे यांनी दिली आहे, त्यामुळे माणिकराव कोकाटे हे सोमवारी राजीनामा देऊ शकतात अशी आता चर्चा सुरू झाली आहे.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या विजय घाडगे यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता, या प्रकरणात सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटल्याचं विजय घाडगे यांनी यावेळी सांगितलं.
——————————————————————————————-






