मुंबई : विशेष प्रतिनिधी
गरज नसलेल्या शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी? असा थेट सवाल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे. या महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा पुराचा फटका बसण्याची शक्यता असून, कोल्हापूर शहरातील तब्बल २५ ते ३० वॉर्डमध्ये पाच ते दहा फूट पाणी साचण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आतापर्यंत अनेक हरकती दाखल करण्यात आल्या असून, या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा केली. “आमची भूमिका आणि शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे. हा महामार्ग नकोच! ” असेही त्यांनी ठासून सांगितले.
ते पुढे म्हणाले, “अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेत व्याज परतावा वेळेवर मिळत नाही. २०२४ मध्ये शिक्षकांसाठी जीआर काढूनही अजून त्यांना सवलती मिळालेल्या नाहीत. मग अशा स्थितीत राज्य सरकार शक्तिपीठ महामार्गासाठी इतका आग्रह का धरत आहे?”
शेतकऱ्यांचे आंदोलन हे सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला पाठिंबा देताना सतेज पाटील यांनी सांगितले की, “हा प्रकल्प जनतेच्या हिताचा नाही. त्यामुळे आम्ही याला विरोध करत आहोत.” शक्तिपीठ महामार्गाविरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, राज्य सरकारकडून या मुद्द्यावर ठोस निर्णय घेतला जातो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जन सुरक्षा विधेयकाबाबत आघाडीमध्ये संभ्रम?
सतेज पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांसोबत या कायद्यासंदर्भात पाच बैठका झाल्या. त्यातील तीन बैठकीत आम्ही विरोध दर्शवला होता. नक्षलवादाचा बिमोड झाला पाहिजे याबाबत आमचा पाठिंबा आहे. मात्र डाव्या विचारसरणीच्या संघटनांवर कारवाई होत असेल तर आमचा स्पष्ट आक्षेप आहे.”
ते पुढे म्हणाले, “केंद्रीय मंत्री सांगतात की ७२ टक्के नक्षलवाद संपला आहे. मात्र पोलिस आणि सीआरपीएफमुळे तो आटोक्यात आला आहे, हे वास्तव आहे. २४ जुलैला शेवटची बैठक होणार होती पण ती पुढे ढकलण्यात आली. २६ जुलैला शाहू जयंती असल्यामुळे आम्ही बैठक २५ किंवा २९ ला घेण्याची विनंती करणार होतो. पण तत्पूर्वीच हे विधेयक सभागृहात मंजूर झालं.”
शिरसाट प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी
मंत्री संजय शिरसाट यांच्या घरात सापडलेल्या पैशाच्या बॅगेवर सतेज पाटील यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “संपूर्ण देशाने पैशाच्या गठ्ठ्यांचा व्हिडीओ पाहिला आहे. आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार का?” असा थेट सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, ” जर त्या बॅगेत कपडे होते असं म्हणत असतील, तर हा अतिशय विनोदी प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.”
शिंदे गटातील कलह आणि भाजपचा पाठिंबा
शिंदे गटातील आमदारांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षावरही त्यांनी भाष्य केलं. “या सर्व घडामोडींना भाजपचा पाठिंबा आहे. ‘कितीही कायदा मोडला तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही’, हा आत्मविश्वासच या सत्ताधाऱ्यांच्या वर्तनामागे आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
सतेज पाटील यांनी विधिमंडळातील कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “कॅबिनेट मंत्री नसल्यामुळे दोन वेळा सभागृह बंद ठेवण्यात आलं. विधान परिषदेमध्ये दोन कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य असताना तीही नसते. आमदार आपल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करतात, पण मंत्र्यांचे ठरलेले स्टॅंडर्ड उत्तर असतं.”
————————————————————————————————