दशरथ खुटाळे : शाहुवाडी
वाड्या वस्त्यांचा तालुका म्हणून ओळखला जाणारा शाहुवाडी तालुका राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील मानला जातो. पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्व देणारा तालुका म्हणून शाहुवाडी तालुक्याची जिल्ह्यात ओळख आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर तालुक्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. इच्छुकांच्या मोर्चेबांधणीपासून ते कार्यकर्त्यांच्या जोडण्यांपर्यंत शाहुवाडीत धामधूम सुरु झाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शाहुवाडी तालुक्याची सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे ते आज आपण पाहणार आहोत.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका मार्गी लागण्याच्या दिशेने आहेत. लवकरच याबाबत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यभरात वॉर्ड रचना व आरक्षण प्रक्रिया सुरु आहे. राज्य सरकारने संबंधित जिल्हा प्रशासनांना वॉर्ड व आरक्षण अहवाल लवकरात लवकर पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यावरून जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. याच अनुषंगाने शाहुवाडी तालुक्यात राजकारण तापलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्यांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. शाहुवाडी तालुक्यातील या आगामी निवडणुका आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील या दोन पारंपारिक गटातच होणार आहेत. २०१७ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तत्कालीन आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांच्या गटाचे वर्चस्व होते. शाहुवाडी तालुक्यात एकूण चार जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत तर ८ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. ४ पैकी ३ जिल्हा परिषद मतदारसंघावर सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांच्या गटाचे वर्चस्व होते तर एका मतदारसंघावर जनसुराज्य शक्ती पक्षाला समाधान मानावे लागले होते.
आपण जिल्हा परिषद मतदारसंघाप्रमाणे आकडेवारी पाहू ..
पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणि मानसिंगराव गटाचे विजय बोरगे विजयी झाले होते. सध्या विजय बोरगे हे जनसुराज्य शक्ती पक्षात दाखल झाले आहेत. सरूड जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे आणि सत्यजित पाटील गटाचे हंबीरराव पाटील निवडून आले होते. शित्तूर वारून जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्जेराव पाटील पेरीडकर विजयी झाले होते. या जिल्हा परिषद मतदार संघात जनसुराज्य शक्ती पक्षाला एकही पंचायत समितीची जागा जिंकता आली नव्हती. पनुंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे आणि सत्यजित पाटील गटाच्या आकांक्षा पाटील विजयी झाल्या होत्या.
आता पंचायत समितीचे बलाबल पाहू..
पिशवी जिल्हा परिषद अंतर्गत येणारे पंचायत समिती मतदारसंघ :
पिशवी पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेचे आणि सत्यजित पाटील गटाच्या अश्विनी पाटील तर ससेगाव पंचायत समिती मतदारसंघातून सत्यजित पाटील गटाच्याच सुनिता पारळे विजयी झाल्या होत्या.
सरूड जिल्हा परिषद अंतर्गत येणारे पंचायत समिती मतदारसंघ :
सरूड पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेचे आणि सत्यजित पाटील गटाच्या लता पाटील तर भेडसगांव पंचायत समिती मतदारसंघातून सत्यजित पाटील गटाचेच दिलीप पाटील हे दोघे विजयी झाले होते.
शित्तूर वारून जिल्हा परिषद अंतर्गत येणारे पंचायत समिती मतदारसंघ :
शित्तूर वारून पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेचे आणि सत्यजित पाटील गटाचे विजय खोत निवडून आले होते. तर कडवे पंचायत समिती मतदारसंघातून कर्णसिंह गायकवाड गटाचे अमर खोत हे विजयी झाले होते. अमर खोत हे आमदार विनय कोरे आणि कर्णसिंह गायकवाड गटाचे एकमेव विजयी उमेदवार होते.
वरील बलाबल पाहिले असता शाहुवाडी तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांच्या गटाचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांना अपयश आले होते. या दोन्ही निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार विनय कोरे यांनी लावलेल्या राजकीय जोडण्या पाहता यावर्षी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या गटाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे तर माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांच्या गटात कुठेतरी मरगळ दिसून येत आहे.

आमदार विनय कोरे यांच्याकडे सर्जेराव पाटील पेरीडकर, कर्णसिंह गायकवाड, महादेव पाटील आणि विष्णू पाटील यांच्यासारखे कसलेले पुढारी आहेत. कर्णसिंह गायकवाड यांना आगामी गोकुळ दुध संघासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या गटाला जिल्हा परिषद निवडणुकीत जागा मिळणार का? हे पाहावं लागणार आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत कर्णसिंह गायकवाड यांच्या गटाला एकही जिल्हा परिषदेची जागा मिळाली नव्हती. कर्णसिंह गायकवाड यांचे बंधू योगीराज गायकवाड यावेळी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण शाहुवाडी तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
माजी आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे एकनिष्ठ नेते सत्यजित पाटील यांच्याबरोबर मानसिंगराव गायकवाड, रणवीर गायकवाड, हंबीरराव पाटील, दिलीप पाटील, एन. डी. पाटील सावेकर या डायरेक्ट जनतेशी ‘कनेक्ट’ असणाऱ्या पुढाऱ्यांची फौज आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जरी अपयश आले असले तरी मतांच्या बाबतीत शाहुवाडीच्या मतदारांनी सत्यजित पाटील यांच्याच बाजूने कौल दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे मानसिंगराव गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव रणवीर गायकवाड या दोघांचा सहकाराच्या माध्यमातून खूप मोठा जनसंपर्क आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या दोघा पिता पुत्रांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांना भक्कम साथ दिली होती. या जोरावर आगामी जिल्हापरिषद निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील.शाहुवाडी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बलाबल आणि तालुक्याची राजकीय परिस्थिती आपण पाहिली. शाहुवाडी तालुक्यात गटातटाचे राजकारण असले तरी धनगरवाड्यांचे आणि बाजारपेठांचे स्थानिक प्रश्न कोण सोडवेल, याला शाहुवाडी तालुक्यातील मतदार निवडून देईल..
शाहुवाडी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बलाबल आणि तालुक्याची राजकीय परिस्थिती आपण पाहिली. शाहुवाडी तालुक्यात गटातटाचे राजकारण असले तरी धनगरवाड्यांचे आणि बाजारपेठांचे स्थानिक प्रश्न कोण सोडवेल, याला शाहुवाडी तालुक्यातील मतदार निवडून देईल..
———————————————————————————



