लंडन : प्रसारमाध्यम स्पोर्टस डेस्क
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखा सोनेरी अध्याय लिहिला जात आहे. वेस्टइंडीज चॅम्पियन्स संघाने जगातील सर्वात महागडी क्रिकेट जर्सी सादर केली असून, ही भव्य जर्सी वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
जर्सी खास का आहे
ही अत्यंत आकर्षक आणि ऐतिहासिक जर्सी दुबईच्या लोरेंज ग्रुपने चॅनेल २ ग्रुपच्या सहकार्याने तयार केली आहे. विशेष बाब म्हणजे ही जर्सी वेस्ट इंडीज क्रिकेटच्या गौरवशाली परंपरेला वंदन करण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे. सर क्लाइव्ह लॉयड, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, कायरन पोलार्ड यांच्या सारख्या वेस्ट इंडीजच्या दिग्गज खेळाडूंच्या सन्मानार्थ जर्सी डिझाइन केली गेली आहे.
जर्सीचं वैशिष्ट्य
-
१८ कॅरेट शुद्ध सोन्याचा वापर
-
३० ग्रॅम, २० ग्रॅम आणि १० ग्रॅम या तीन आवृत्त्यांमध्ये उपलब्ध
-
प्रत्येक जर्सीची किंमत जवळपास ३ लाख रुपये
ही जर्सी केवळ खेळासाठी नाही, तर वेस्टइंडीज क्रिकेटच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांचे प्रतीक मानली जात आहे.
दिग्गज खेळाडूंची उपस्थिती
या भव्य जर्सीचे अनावरण ड्वेन ब्राव्हो, ख्रिस गेल आणि कायरन पोलार्ड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी ही जर्सी परिधान करत क्रिकेटमधील “स्टाईल आणि सन्मान” यांचा संगम घडवल्याची भावना व्यक्त केली. ड्वेन ब्राव्हो म्हणाले, “ही केवळ एक जर्सी नाही, तर वेस्टइंडीजच्या क्रिकेट परंपरेचा सुवर्ण ठसा आहे. आम्ही आमचा इतिहास आणि अभिमान अंगावर परिधान करत आहोत.”
वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स स्पर्धा
या स्पर्धेला १८ जुलैपासून सुरुवात झाली असून, अंतिम सामना २ ऑगस्ट रोजी होणार आहे. भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडीज या सहा संघांतील माजी खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. या जर्सीच्या घोषणेमुळे वेस्टइंडीज संघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, क्रिकेटच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण लाखो चाहत्यांसाठी विशेष ठरणार आहे.
—————————————————————————————