कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन प्रभावित झालं आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात काल (मंगळवार, दि. १५) दिवसभर मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. काही भागांत तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती वाटू लागली होती. मात्र, आज बुधवार ता. १६ सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय.
कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातही पावसाची जोरदार हजेरी
घाटमाथ्यांवर पावसाचा जोर कायम आहे. महाबळेश्वर, पाटण, वाळवा, कराड, भुदरगड, राधानगरी या परिसरात कालपासून रात्रभर जोरदार पाऊस झाला.
कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढत असली तरी सध्या ती इशारा पातळीखाली आहे. प्रशासन सतर्क आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी काही भागांत रेंगाळत वाहत असून सखल भागांमध्ये थोडेफार पुराचे चटके बसले आहेत.
साताऱ्यात खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ
रायगड जिल्ह्यात काल ८५.५६ मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे नागोठणे-रोहा राज्य मार्गावर दरड कोसळली होती, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत दरड हटवली असून आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी साचलेलं पाणी ओसरल्याने मार्ग मोकळा झाला आहे.
म्हसळा तालुक्यातील ढोरजे पूल काल पाण्याखाली होता. मात्र आज पावसाचा जोर कमी झाल्याने पुलावरील पाणी ओसरलं आहे.
काल काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती, पण आजपासून त्या नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत घाटमाथ्यांपासून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोल्हापूर आणि साताऱ्यात दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे प्रशासनाने आवाहन केलं आहे. रायगडमध्ये काल पावसाने थैमान घातले असले तरी आज काहीशी उसंत मिळाली आहे. तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मात्र आज सकाळपासून पावसाचा जोर कमी असून प्रशासन सतर्क आहे. नद्या सध्या इशारा पातळीच्या आत असून पुराची स्थिती नियंत्रणात आहे.
———————————————————————————-