कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता निवळलं असून, समुद्र सपाटीपासून सुमारे ५ . ८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यामुळे विदर्भात पावसाने तात्पुरती विश्रांती घेतली आहे. मात्र, ११ ते १४ जुलै दरम्यान राज्यातील काही भागांत पावसाचा हलका ते मध्यम जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पावसाचा जोर कमी होणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जुलै नंतर राज्यभरात पावसाचा जोर कमी होईल. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात काहीशी विश्रांती पहायला मिळेल. मात्र, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात दमदार पाऊस
राज्यातील बहुतांश भागात जून महिन्यात पावसाचा तुटवडा होता. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात जून मध्ये समाधानकारक पावसाची नोंद झाली नव्हती. मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात दमदार पाऊस झाला असून, चंद्रपूर, नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामाला चालना मिळाली असून, शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत.
-
कोल्हापूर : ११ ते १३ जुलै दरम्यान हलकासा पाऊस होण्याची शक्यता, १४ जुलैनंतर आकाश निरभ्र होईल.
-
सांगली : उष्ण, दमट हवामानासह ढगाळ परिस्थिती; काही भागांत संध्याकाळी हलकी सरी.
-
सातारा : घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी; पठार भागात ढगाळ वातावरण.
हवामान विभागाने २० जुलै नंतर बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा एकदा नवीन प्रणाली सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा टप्पा सुरु होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
————————————————————————————–