राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रलंबित असलेली २२०० कोटी रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत अथवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय बाबत सरकार योग्य वेळी निर्णय घेईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेना शिंदे गटाच्यावतीने मराठवाड्यात मदतीचे ट्रक पाठवण्यात आले. या ट्रकला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर शिंदे बोलत होते.
मराठवाड्यात अतिवृष्टी सातत्याने होत असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी माती खरवडून गेली आहे अशा ठिकाणी सुद्धा तातडीने पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना मदत देण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जे नागरिक पुरात अडकले होते त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याविषयी एनडीआरएफ आणि सैन्य दलाला कळवण्यात आले आहे. मराठवाडा विदर्भात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात घरांची पडझड आणि जनावरे सुद्धा वाहून गेल्याची भीती आहे या सर्व बाबतीत तातडीने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात अथवा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून याबाबत सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय आणि इतर मदत रवाना
दरम्यान आपत्तीग्रस्त भागात तातडीने वैद्यकीय कक्षा द्वारे मदत देण्यात आली असून संबंधितांपर्यंत औषधे आणि डॉक्टर्स पोहोचले आहेत. तसेच प्रताप सरनाईक यांनी या भागाचा नुकताच दौरा केला होता आता त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये तातडीने मदत देण्यात येत आहे. भांडी, ब्लॅंकेट, चादरी, कपडे या वस्तू पर्यंत तातडीने पोहोचवल्या जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यासाठी पक्षाच्या वतीने ५० ते ६० ट्रक आपत्तीग्रस्त भागात रवाना करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान या पूर परिस्थिती नंतर साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता असल्याने आरोग्यमंत्री स्वतः सर्व ठिकाणी जाऊन आढावा घेतील आणि साथीचे रोग पसरणार नाही यासाठी दक्षता घेतली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
संकट काळात राजकारण नको
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे न करता तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्याचा आग्रह धरला आहे या संदर्भात विचारले असता शिंदे म्हणाले की ते स्वतः मुख्यमंत्री होते अशा पद्धतीने त्यांनी कधी मदत दिल्याचे ऐकिवात नाही. मात्र अशा संकट समयी सर्व पक्षांनी राजकीय विरोध विसरून एकत्र येऊन मदत करण्याची गरज आहे जे मदत करतील त्या सर्वांचे सरकार म्हणून आम्ही स्वागतच करू, असेही शिंदे म्हणाले.