मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानभवनातील सभागृहात रमी खेळल्याच्या कथित व्हिडीओनंतर विरोधक आक्रमक झाले असून, राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली.
“मला जी माहिती मिळाली त्यानुसार, सभागृहात आत हे घडलं आहे. विधीमंडळाचा परिसर राम शिंदे आणि सभापती राहुल नार्वेकर यांच्या अख्त्यारित येतो. त्यांनी चौकशी सुरु केल्याची मला माहिती आहे. मात्र, अद्याप माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झालेली नाही. कोकाटे म्हणतात की, ते खेळत नव्हते. सोमवारी किंवा मंगळवारी माझी त्यांच्याशी भेट होईल. त्यानंतर नेमकं काय घडलं याबाबत निर्णय घेण्यात येईल,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर आम्ही सर्व मंत्र्यांना सुचना दिल्या होत्या. आम्हा तिघांनी (उपमुख्यमंत्री शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस आणि मी) आपापल्या पक्षातील मंत्र्यांना सांगितलं होतं की, प्रत्येकाने राज्याची जबाबदारी लक्षात ठेवून वागलं पाहिजे. यापूर्वीही कोकाटेंच्या वागणुकीबाबत चर्चा झाली होती, जाणीव करून दिली होती. आता ते म्हणत आहेत की त्यांनी खेळलंच नाही, तर ते सत्य काय आहे ते चर्चेनंतरच स्पष्ट होईल.”
अजित पवार यांनी विरोधकांनाही सुनावलं. रोहित पवारांनी दिलेल्या, “राजीनामा न घेतल्यास व्हिडीओ बाहेर काढू,” या इशाऱ्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं, “हे दमदाटीचं राजकारण थांबवलं पाहिजे. व्हिडीओ आहेत, पेनड्राईव्ह आहेत हे सांगायचं बंद करा. जे काही आहे ते एकदाच बाहेर काढा. लोकांनाही सगळं समजेल. मागच्या आणि त्याआधीच्या सरकारच्या काळातसुद्धा अशीच पेनड्राईव्हची भाषा वापरली जायची. सर्वजण संशयाच्या भोवऱ्यात राहतात. मंत्री, आयपीएस, राजकीय लोक यांचा उल्लेख केला जातो, पण सत्य बाहेर येणं गरजेचं आहे.”
“पोलीस यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करत आहे. पुरावे असतील, तर जरूर द्यावेत. रितसर चौकशी केली जाईल,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
शेवटी, सरकारची रचना आणि निर्णय प्रक्रियेबाबत ते म्हणाले, “हे तीन पक्षांचं सरकार आहे. कुठलंही निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री फडणवीस आणि मी एकत्र बसून चर्चा करतो. निर्णयही तिघांच्या चर्चेनंतरच घेतले जातात. मात्र, राज्याचे प्रमुख म्हणून काही निर्णय मुख्यमंत्री फडणवीस स्वतंत्रपणेही घेऊ शकतात.” या संपूर्ण घडामोडीनंतर आता लक्ष लागलं आहे ते सोमवारी कोकाटे आणि अजित पवार यांच्यातील चर्चेकडे. त्यानंतर या प्रकरणात नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
———————————————————————————————-