कुरुंदवाड : प्रतिनिधी
गेले दोन तीन दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने शुक्रवारपासून कोयना, वारणा धरणातून सुरु असलेला विसर्ग कमी करण्यात आला आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. आज सकाळी अकरा वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटावरुन खाली करुन पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. आता यातून मात्र धरण पायथा विद्युतगृहातील एकुण २१०० क्युसेक एवढाच विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.
वारणा धरणातूनही शुक्रवारी सकाळी ८ वाजता सुरु असलेला एकूण ८५३६ क्युसेक विसर्ग सकाळी ११ वाजल्यापासून कमी करुन तो एकूण ४४७० क्युसेक करण्यात आला आहे. राधानगरी धरणक्षेत्रातही पाऊसमान कमी झाल्याने धरणाचे सर्व स्वंयचलित दरवाजे बंद झाले आहेत. धरण विद्युत गृहातून एकूण १५०० क्युसेक एवढाच विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.
कोयनेसह वारणा, राधानगरी धरणातून विसर्ग बहुतांशी कमी झाल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा-पंचगंगेची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता राजापूर धरणाजवळ पाणी पातळी ३५ फुट होती, ती सांयकाळी पाच वाजता ३३ फुट झाली आहे. नृसिंहवाडीजवळ सकाळी पाणी पातळी ४४ फुट ६ इंच होती, ती सांयकाळी ४३ फुट ३ इंचावर आली आहे. यानुसार तालुक्यातील कृष्णा -पंचगंगेचा पुर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आँगष्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे प्रत्येक वर्षी आँगष्ट महिन्यात शिरोळ तालुक्यात येणार्या पुरापासून सुटकेची नदीकाठावरील नागरीकांना एकप्रकारे हमी मिळाली आहे. तरीही मागील चार- पाच वर्षाचा अनुभव पाठीशी असल्याने येथील नागरिकांमध्ये १५ ऑगस्ट पर्यंत पुराची हुरहुर ही मनात राहणारच आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील विविध नद्यावरील ३८ बंधारे पाण्याखाली होते, यामध्ये दिवसभरात ८ बंधार्यावरील पाणी ओसरले आहे.सांयकाळी पाच वाजेपर्यंत ३० बंधारे पाण्याखाली आहेत.
दरम्यान शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात ८६.३४ टीएमसी, वारणा धरणात २८.३४ टीएमसी, राधानगरी धरणात ८.२७ टीएमसी तर अलमट्टी धरणात ९९.४६४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तसेच हिप्परगी धरणातून १,१५,०५० क्युसेकने विसर्ग पुढे कर्नाटकात सुरु आहे. पूर ओसरत असला तरी अजूनही नृसिंहवाडी दत्त मंदिराला कृष्णेचा वेढा कायम आहे.
————————————————————————————



