अनिल जासुद : कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी श्री दत्त मंदिराजवळचे पाणी सोमवारी ओसरत असतानाच मंगळवार सकाळ पासून पुन्हा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे नृसिंहवाडी श्री दत्त मंदिराला पुन्हा पुराचा वेढा पडला आहे. परिणामी, आणखी दोन-तीन फूट पाणी वाढल्यास आज बुधवारी दुपार पर्यंत या मोसमातला दुसरा चढता दक्षिणद्वार सोहळा होऊ शकतो.
गेल्या बुधवारी म्हणजेच २५ जून रोजी दुपारी एक वाजता पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला होता.
धरण पाणलोट क्षेत्रात गेले चार-पाच दिवस पावसाने उघडीप दिली होती. यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा -पंचगंगा नदीचा पुर संथ गतीने ओसरु लागला होता. सोमवारी दुपारी श्री दत्त मंदिराजवळचे सर्व पाणी ओसरुन मंदिर दर्शनासाठी खुले झाले होते.
सोमवार पासून पावसाने धरणपाणलोट क्षेत्रात पुन्हा जोर धरला आहे. यामुळे मंगळवार सकाळपासून कृष्णेच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बुधवारी पहाटे सहा वाजता नृसिंहवाडी श्री दत्त मंदिराच्या पादुकांपर्यंत पाणी आले आहे. यामुळे श्री दत्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गुडघ्याएवढ्या पाण्यातूनच दर्शन घेत आहेत.
गेल्या तीन-चार दिवसांतील पावसाच्या उघडपीमुळे तालुक्यातील कृष्णा-पंचगंगेचे पाणी काही अंशी इंचाइंचाने ओसरत होते. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा सुरु झालेल्या पावसामुळे दोन्ही नदींच्या पाणी पातळीत फुटाफुटाने वाढ होत आहे. दरम्यान, धरणपाणलोट क्षेत्रातील पावसाच्या उघड झापेचा परिणाम शिरोळ तालुक्यातील कृष्णा -पंचगंगेच्या पाणी पातळीवर होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नृसिंहवाडी श्री दत्त मंदिराला पुराचा वेढा कायम आहे.
रविवारी सांयकाळी ५ वाजता राजापूर धरणांजवळ पाणी पातळी २८ फूट ११ इंच होती. सोमवारी सांयकाळी ५ वाजता पाणी पातळी २८ फूट १ इंचावर आली होती. ती पुन्हा मंगळवारी सायंकाळी ५ वाजता २९ फूट २ इंचावर गेली. आज सकाळी ८ वाजता ३० फूट ४ इंचावर गेली आहे. यानुसार दिवसभरात पाणी पातळीत सव्वा फुटाने वाढ झाली. बुधवारी सकाळी ८ वाजे पर्यंत कोयना धरणात ५६.०३ टीएमसी, वारणा धरणांत २५.३१ टीएमसी पाणीसाठा होता. तर अलमट्टीमध्ये ८७.७३७ टीएमसी पाणी साठा झाला आहे.
—————————————————————————-



