कुरुंदवाड : प्रतिनिधी
राधानगरी व कोयना धरणपाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून कोयना व राधानगरी धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी नृसिहावाडी येथील कृष्णेच्या पात्रात पाणी वाढत आहे. आज पासून विसर्ग आणखी वाढविण्यात आला असून जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना, राधानगरी धरणातील विसर्गाबरोबरच आज पासून वारणा धरणातूनही विसर्ग सुरु करण्यात आला आहे. विविध धरणातील विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळे धरण पाणी साठ्यात सतत वाढ होत आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून कोयना व राधानगरी धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण आणखी वाढल्याने सकाळी सुरु असलेल्या विसर्गामध्ये दुपारी ४ वाजता आणखी वाढ करण्यात आली आहे. सकाळी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचललेले होते. यातुन १२,१०० क्युसेक विसर्ग सुरु होता. दुपारी ४ वाजता यामध्ये धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावरुन तीन फुटापर्यंत उघडले आहेत. यातून १९,२०० क्युसेक विसर्ग व धरण विद्युत पायथा गृहाच्या दोन्ही युनिटमधून २१०० क्युसेक असा एकूण २१,३०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.
राधानगरी धरणाचे एकूण सात स्वंयचलित दरवाजे उघडले असुन यातून १०,००० क्युसेक व विद्युतगृहातून १५०० क्युसेक असा एकूण ११,५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. तर वारणा धरणपाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस होत असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज वारणा धरणाच्या वक्र दरवाज्यातुन १०,००० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. तर विद्युत गृहातून १६३० क्युसेक विसर्ग सुरु असुन एकूण ११,६३० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. धरण पाणलोटक्षेत्रात पाऊस वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातील विसर्गही वाढविण्यात येणार आहे.
सध्या कोयनेतून एकूण २१,३०० क्युसेक ,राधानगरीतून ११,५०० क्युसेक व आता वारणेतून ११,६३० क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. विविध धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा- पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सांयकाळी ४ वाजेपर्यंत राजापूर बंधार्याजवळ पाणी पातळी २६ फुट ४ इंच,तर नृसिंहवाडीजवळ पाणी पातळी ३६ फुट झाली आहे.
धरणातील विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील विविध नद्यावरील १९ बंधारे पाण्याखाली होती. तर सांयकाळी ४ वाजता ४५ बंधारे पाण्याखाली गेली आहेत.
हवामान खात्याने पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते.
दरम्यान शिरोळ तालुक्यातही आज दिवसभर सर्वत्र धुवाँधार पाऊस सुरु आहे. आज सांयकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात ९६.८७ टीएमसी,वारणा धरणात ३२.०४ टीएमसी,अलमट्टी धरणात ११६.७०० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.