कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात कालपासून पावसास पुन्हा सुरुवात झाली. काल रिमझीम स्वरूपाचा पाऊस होता. मात्र आज सकाळी सहा वाजल्यापासून पावसाने जोरदार सुरुवात केली. फक्त तीन तासात कोल्हापुरातील अनेक रस्त्यावर पाणीच पाणी झाले. भल्या सकाळी पावसाने सुरुवात केल्याने सारीच कामे रेगाळली. आज कोल्हापुरात कवाळ पंचमी. अंबाबाई ते त्र्यंबोली पालखी मार्गावर रांगोळी रेखाटली जाते. मात्र एकसारख्या पडणाऱ्या पावसामुळे सजावटीत अडथळा निर्माण झाला.
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने आज पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच, हवामान खात्याने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

रत्नगिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस होत असून नवरात्रौत्सवाच्या काळात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, रात्रीच्या सुमारास रत्नगिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. मुंबई वेधशाळेने ३० सप्टेंबर पर्यत रत्नगिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यामुळे, शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडले आहे.
इलापूर धरणाच्या ११ दरवाज्यांमधून १८ हजार ६६८ क्युसेक विसर्ग पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने मराठवाड्याहून विदर्भाकडे जाणारा पुसद-शेंबाळपिंपरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पावसामुळे नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत. वसमत तालुक्यातील पांघरा शिंदे, दांडेगाव दांडेगावकडे जाणारे मार्ग ओढ्याला पाणी आल्याने बंद पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई, रायगड, ठाणे, पुण्यातील घाट, साताऱ्यातील घाट, रत्नगिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापुरातील घाट, धाराशिव, लातूर आणि नांदेड यां भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि इतर भागातना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
————————————————————————————————–