कोल्हापूर : प्रसारमाध्यम
९४ वर्षांच्या वयात वॉरन बफे यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली. दोन वर्षांपूर्वी त्यांचे दीर्घकालीन साथीदार असलेले “चारली मंगर” गेल्यानंतर झालेल्या AGM मध्ये त्यांनी मंगरच्या नसण्यामुळे एकटेपणा जाणवत असल्याचे बोलून दाखविले होते. तेव्हाच त्यांच्या या निर्णयाची चुणूक लागली होती. पण त्यांच्या गुंतवणुकीच्या तत्त्वज्ञानाचा प्रकाश अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहणार आहे हे नक्की !
वॉरन बफे यांचं आयुष्य हे केवळ पैशांपुरता मर्यादित नव्हतं — ते शहाणपणाचं, संयमाचं आणि मूल्याधिष्ठित निर्णयांचं होतं. त्यांनी कधीही झगमगाटाचा माग नाही धरला. १९५८ पासून ते ओमाहामधल्या त्यांच्या जुन्या घरात राहतात, मॅकडोनाल्डचं नाश्ता खातात, कोका-कोला पितात आणि दररोज ५-६ तास वाचन करतात.
बफे यांच्या एकूण संपत्तीचा ९९% हिस्सा त्यांच्या मुलांना न देता, दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हा फक्त आर्थिक निर्णय नाही, ही एक मूल्यांची जाहीर सांगड आहे.
१९६५ मध्ये त्यांनी Berkshire Hathaway या अडचणीत असलेल्या कपड्यांच्या कंपनीचा ताबा घेतला. तेव्हा तिचा शेअर $18 च्या आसपास होता. आज त्या कंपनीची किंमत $1.16 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे आणि तिचा शेअर $600,000 च्या वर आहे. बफे यांनी Berkshire Hathaway द्वारे कधीही स्वतःचा प्रॉडक्ट तयार केला नाही. त्यांनी इतर बिजनेस खरेदी केले, दीर्घकाळासाठी त्यांमध्ये गुंतवणूक केली, आणि कॅपिटल अलोकेशनचे सर्वोत्कृष्ट उदाहरण जगासमोर उभे केले.
एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत ते हाईप, अनेक नवनवीन टेक फॅड्स, आणि शॉर्ट-टर्म ट्रेडिंगपासून कायम दूर राहिले. त्यांनी फोकस केला कंपनीच्या फंडामेंटल्सवर, अंतर्गत मूल्यावर, कॅश फ्लो आणि मॅनेजमेंटच्या गुणवत्तेवर.
२०२५ च्या शेवटच्या वार्षिक मिटिंगमध्ये बफे यांनी CEO पद सोडल्याचं जाहीर केलं. त्यांच्या जागी Greg Abel हे नवे CEO असतील. बफे हे आता सल्लागार म्हणून काम करत राहतील.
बफे यांची गुंतवणुकीची तत्त्वं कोणत्याही गुंतवणूकदारासाठी एक अनमोल मार्गदर्शन आहेत :
Margin of safety – नेहमी सुरक्षिततेचं अंतर ठेवा. (कमीत कमी भावात शेअर्स खरेदी करा)
Circle of competence – ज्या गोष्टी समजतात त्यातच गुंतवणूक करा
Compounding – वेळेच्या शक्तीवर विश्वास ठेवा
Don’t lose money – नुकसान टाळणं हे पहिलं तत्व
“गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी उच्च IQ लागत नाही, तर्कशुद्ध आणि स्थिर स्वभाव लागतो,” असं त्यांनी शेवटच्या भाषणात सांगितलं.
वॉरन बफे यांनी जवळपास ७० वर्षं एकाच खेळात भाग घेतला – मूल्य-आधारित गुंतवणूक. (Value Investing) आणि त्यात ते शेवटी जिंकलेच.
जर तुम्हाला पैसा, गुंतवणूक आणि संयम समजून घ्यायचा असेल, तर त्यांनी लिहिलेलं आणि सांगितलेलं सर्व वाचा. कारण वॉरन बफे यांच्यासारखाही दुसरी व्यक्ती कधीच होणार नाही.
——————————————————————————————-