कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आषाढी एकादशी निमित्त करवीर तालुक्यातील नंदवाळ येथे ‘ वारी स्वच्छतेची, वारी आरोग्याची ‘ या विशेष उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. वारणा समूह, प्रसारमाध्यम आणि अवनि च्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. नंदवाळ हे ठिकाण आद्य पंढरपूर म्हणून ओळखले जाते आणि येथे प्रतिवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुमारे एक ते दोन लाख भाविक आणि वारकरी नंदवाळ येथे दाखल होतात.
यात्रेनंतर मंदिर परिसर आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. यामुळे परिसरात अस्वच्छतेसह आरोग्यविषयक समस्याही निर्माण होत असतात. या समस्येवर उपाय म्हणून वारणा दूध प्रक्रिया उद्योग समूह, प्रसारमाध्यम आणि ‘अवनी’ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीला विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वारी दरम्यानच भाविक आणि वारकऱ्यांना स्वच्छतेचा जागर दिला जाणार आहे. ‘वारी स्वच्छतेची, वारी आरोग्याची’ या संदेशातून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येईल. त्याचबरोबर परिसरातील कचरा उचलणे, कचरापेट्या लावणे, प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करणे यासारख्या कृतीशील उपक्रमांचा समावेश असणार आहे.
नंदवाळ येथील ग्रामस्थ, वारणा समूहाचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक प्रशासन या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणार आहेत. तसेच, परिसरातील नागरिकांना देखील या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीची वारी ही केवळ भक्तीची नव्हे तर समाजप्रबोधनाची आणि स्वच्छतेच्या जनजागृतीची संधी ठरावी, असा उद्देश या उपक्रमामागे आहे. त्यामुळे यंदाची वारी अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
————————————————————————————-






