मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकां दरम्यान अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ४०.८१ लाख मतदारांची वाढ झाल्याबाबत विरोधकांकडून आधीच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता विधानसभा निवडणुकी नंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात आणखी १४.७१ लाख नव्या मतदारांची भर पडल्याचे समोर आले आहे.
मतदार यादीत झालेली अधिक नव्या मतदारांची भर ही केवळ आकडेवारी नाही, तर भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या आधीच मतदारांची ही वाढ सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही संधी आणि आव्हान घेऊन आली आहे.
मतदार संख्येतील वाढ
-
शहरी भागातील आघाडी : पुणे, ठाणे, मुंबई उपनगर या जिल्ह्यांत सर्वाधिक नवे मतदार नोंदले गेले आहेत. हे तिन्ही जिल्हे राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरतात. येथे तरुणांची लाट असण्याची शक्यता अधिक असल्याने शैक्षणिक, रोजगार आणि शहरी विकासाचे प्रश्न निवडणुकीत केंद्रस्थानी राहतील.
-
ग्रामीण भागातील स्थैर्य : ग्रामीण जिल्ह्यांत वाढ तुलनेने कमी आहे. यामुळे पारंपरिक मत बँकांमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, पालघर आणि नागपूर मध्ये झालेली वाढ स्थानिक समीकरणे ढवळून काढू शकते.
विरोधकांचा संशय विरुद्ध वास्तव
गेल्या निवडणुकांदरम्यान विरोधकांनी मतदार यादीतील आकडेवारीवर शंका उपस्थित केली होती. परंतु या वेळी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. यावरून दोन गोष्टी लक्षात येतात. विरोधकांकडे ठोस पुरावे नाहीत. किंवा या वाढीचा फायदा त्यांनाही मिळण्याची शक्यता आहे.
घरबदल – स्थलांतरित मतदारांचे समीकरण
एक लाख शहाण्णव हजार मतदारांनी घर बदलामुळे नव्या मतदारसंघात नोंदणी केली आहे. हे मतदार निर्णायक ठरणारे “फ्लोटिंग व्होटर्स” मानले जातात. कारण, त्यांची पारंपरिक निष्ठा ठरलेली नसते. त्यामुळे स्थानिक उमेदवारांची लोकप्रियता आणि स्थानिक प्रश्नांवरील भूमिका या मतदारांचा कल ठरवतील.
राजकीय समीकरणांवरील थेट परिणाम
-
सत्ताधारी आघाडीला संधी : नवे मतदार हा विकासाच्या आश्वासनांना भुलणारा वर्ग असल्याने सत्ताधाऱ्यांना त्यांचा फायदा होऊ शकतो.
-
विरोधकांसाठी आव्हान : नवे मतदार आपल्या पारंपरिक समीकरणांच्या चौकटीत न बसणारे असल्याने विरोधकांना नवे विषय उचलावे लागतील.
-
स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्ता : शहरी मतदारसंख्या वाढल्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूरसारख्या महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठीची लढाई अधिक चुरशीची होणार आहे.



