देव असला म्हणून काय झालं, त्याला संसार आहेच की, जगाचा संसार करणारा स्वतःच्या संसारापासून वंचित राहतो, ते दुःख काय आणि किती मोठं असेल, जो स्वतः प्रेमस्वरूप आहे, त्याच्या प्रेमाच्या संकल्पनेचं काय, त्यालाही वाटत असेल पत्नीच्या हातात हात घालून फिरावं, तिच्याशी संसाराचं हितगुज करावं, एकत्र बसून जेवण करावं, वाटत असेल की तिला भेटावं, तिच्या सोबत चंदभागेच्या वाळवंटात हातात हात घालून चालावं, सुख दुखाच्या गोष्टी कराव्यात.
विठ्ठला ..मायबापा अभंगाचे सूर आता टिपेला पोहोचले होते, विठू नामाच्या गजरात हरीभक्त तल्लीन झाले होते. दूरवरच्या मठीत भजनासाठी एकत्र जमलेल्या हरीभक्तांचा भैरवी नंतरचा विठू नामाचा गजर आता टिपेला पोहोचला होता.
जय जय राम कृष्ण हरी ..जय जय राम कृष्ण हरी
नाम घेण्यासाठी देवावर विश्वास असण्याची आवश्यकता नाही. पण माणसाच्या मनातला देव जागृत करण्याची ताकद नामात आहे. हे मात्र कोणीही अगदी ठाम विश्वासाने सांगू शकेल. ही अनुभूती घेण्यासाठी एकवार त्याचे दर्शन आणि नामात न्हाऊन निघावे लागते.
त्याच्यावरची भक्ती, प्रीती, त्याचे नामस्मरण, त्याचे भजन, त्याच्या दर्शनाची आस, त्याचे प्रत्यक्ष दर्शन, त्याच्या चरणांचा स्पर्श या सर्वांची अनुभूती कोणत्याच माध्यमातून व्यक्त करताच येत नाही. कारण, हे सर्व भाव, भावना, त्यातून घडलेली कृती आणि सर्व व्यवहार हे आपण आणि तो असं दोघांतच घडतात आणि म्हणूनच ती फक्त आणि फक्त अनुभूतीच असते.
संध्याकाळी त्याचे दर्शन झाले, त्याचे रूप डोळे भरून हृदयात साठवले त्याच्या चरणावर माथा टेकला. काही सेकंदांच्या स्पर्शाने कित्येक जन्मांची ओळख पटली आणि देहभान हरपले. जगात सगळ्या नात्यांच्या सर्व प्रकारच्या भावनांच्या स्पर्शाची ओढ कधीतरी संपून जाते. संपत नाही ती या चरणांच्या स्पर्शाची ओढ प्रत्येक स्पर्शागणिक ही ओढ अधिक उत्कट होत जाते आणि नाते अधिक दृढ करत जाते. हा स्पर्श शरीराला नाही तर आत्म्याला होतो आणि एकदा हा सावळा स्पर्श झाला की, आतमध्ये सूर्योदय झाल्याची अनुभूती येते.
मी अनुभवलं आहे इथल्या घड्याळात काटे पुढे सरकत राहतात. पण, इथं पंढरीत त्याच्या चरणापाशी काळ थांबलेला असतो.
दर्शनाने मनच भरलं नव्हतं. सकाळी पुन्हा एकदा दर्शन घ्यावे त्यासाठी आज मुद्दाम वस्तीला राहिलो होतो. अंथरुणावर पडून बराच वेळ अभंगाचे ते सूर ऐकत होतो. झोप आहे की नाही हेच कळत नव्हत. कदाचित प्रवासाने शरीर थकलं होत पण मन सारखं पांडुरंगाकडे धाव घेत होतं.
उठून खिडकी उघडली. विठू नामाचा गजर अधिक गडद होत आत खोलवर शिरला..मन पुन्हा कासावीस झालं.. राउळाच्या परिसरात आणि चंद्रभागेच्या वाळवंटात फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. पायात चप्पल घालायची इच्छा झाली नाही. मनाची वेगळीच अवस्था झाली होती. राउळाच्या दिशेने पावलं आपसूक पडू लागली.
देवातलं देवपण जागृत करण्याची ताकद ज्यांच्या भक्तीत होती असे पुण्यात्मे ज्या वाटेवरून पांडुरंगाला भेटले. अशा या वाटेवर लौकीकाने चालण्याचं भाग्य लाभावं या सारखं नशीब नाही की पुण्य नाही. वारीत चार पावलं चाललं तरी इथल्या धुळीत पूर्वजन्माच्या पाऊलखुणा सापडतील. कुठेतरी ओळखीची खूणगाठ मिळतेच.
ज्या वाटेवर ज्ञानोबा, तुकोबांचे पाय उमटले, गेली अनेक शतके भागवत धर्माची पालखी ज्या वाटेवरून विठाई ला भेटायला जात आहे, ती ही वाट. या वाटेवरून सहज चाललं तरी वारीच पुण्य लाभावं.
तशी पंढरपुरातील प्रत्येक वाट म्हणजे वारीची वाट… कोणी बोलावले नाही, कसलं निमंत्रण नाही, कुठला नवस नाही की कसली अपेक्षा नाही आणि ओढ फक्त त्याच्या दर्शनाची. नित्यनेमाने पंढरीची वाट धरणाऱ्या या भाबड्या भक्तांच्या भक्तीने वैकुंठच पृथ्वीवर आलं की पृथ्वीचं वैकुंठ झालं हे नक्की सांगता येणार नाही.
देवाच्या दर्शनाला फक्त दर्शनाची ओढ लागते बाकी काही नसलं तरी चालतं आणि म्हणूनच वारीतून पंढरीत येणाऱ्या प्रत्येकाच्या दर्शनाची तहान भागते. कोणत्या ना कोणत्या रुपात भाबड्या भक्ताला तो भेटतोच.
एखाद्याच्या भक्तीने त्याच्यावरच्या प्रीतीने त्याचा भक्तच महान व्हावा त्याला देवपण यावे अशा त्या देवाचे गुणगान काय आणि कसे गावे. त्याच्या वाटेवर चालणाऱ्या त्याच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकामध्ये तो स्वतः मिसळून जातो , त्यांच्यातच एकरूप होतो. एकदा मुखात त्याचे नाम स्थिर झाले आणि त्याच्या भक्तीचा लळा लागला की, सामान्य नराचा नारायण होतो. या वारीच्या वाटेवर चालणाऱ्या कित्येक पावलांच्या पायातील चपलांच्या खडावा आणि पादुका झाल्या.
अनवाणी चालणारे अमंगळ देह पावन झाले. वारीच्या वाटेवर ज्या ज्या ठिकाणी उष्टे खरकटे सांडले त्या मातीचं सोनं झालं. ज्या घरात त्यांचे प्रवेश झाले जिथला उंबरा ओलांडून तेआत गेले ते उंबरे सोन्याचे झालेआणि त्या घरातील मागच्या पुढच्या सर्व पिढ्यांचा उद्धार झाला.
मघाशी मंदिरात वावरताना सुद्धा इथल्या प्रत्येक खांबाला, इथल्या वस्तूंना कोणकोणत्या संतांचा स्पर्श झाला असेल. ज्ञानेश्वर माउली, त्यांची भावंड, तुकोबा महाराज, एकूण सारीच संत मंडळी टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या भक्तांसोबत विठ्ठल कसा नाचला असेल. नामदेव महाराजांच्या हातून नैवेद्याचा घास कसा खाल्ला असेल, खाताना काय काय बोलले असतील.अशा एक न हजार गोष्टी मनात येत होत्या.
मंदिरा समोर आता गर्दी अगदीच विरळ झाली होती. समोरची दुकाने बंद झाली होती. एखादं दुसरा भक्त आणि स्थानिक माणसांशिवाय कोणी नव्हते. मंदिराचे शिखर, चोखोबांची समाधी अगदी नामदेव पायरी देखील समाधिस्त वाटत होती. आकाश इतक निरभ्र आणि स्वच्छ होते की, उघड्या डोळ्यांना वैकुंठ दिसावे. त्याच्या आकाशाच्या अंगणात विसावलेली नक्षत्रे, ग्रह, तारे हे त्याने निर्माण केलेलं सगळं वैभव खुलून दिसत होते. जिथे अखंड मानवजातीवर भागवत धर्माचे आणि भक्तीचे संस्कार केले त्या अंगणात आपण उभे आहोत ही भावनाच सुखावणारी वाटली. इथला आवार समोरची गल्ली, सगळं ओळखीचं वाटत होतं.
चंद्रभागे कडे जाणारा रस्ता नेहमीसारखाच पण आता अगदी जवळचा वाटत होता. एकट्यानी चालताना असंख्य वारकऱ्याच्या टाळ, मृदंगाचा, हरिनामाचा स्वर कानात वाजू लागला, साथ करू लागला. एकेक पावलांसोबत एकेक जन्म उलगडावा इतका अंतर्मुख झालो होतो.
विचार करत करत कधी चंद्रभागेच्या पात्रात आलो आणि पायाला वाळूचा स्पर्श झाला कळलेच नाही. भक्तांच्या संगतीने माझा विठ्ठल देखील या वाळूत नाचला असेल, फुगडी खेळला असेल, कैवल्याच शिंपण झालेली ही वाळू, पंढरीच्या माती सारखाच या वाळूला देखील कस्तुरीचा सुगंध आहे. इथे उभारून दोन्ही हातांनी सारे आसमंत सहज कवेत घेता येते.
वाळूतच मांडी घालून बसलो. नदी पात्रात दूरवर माणसांची चाहूल नव्हती, तसे पात्रात खूप पाणी देखील नव्हते. आवाज होता तो पण शांततेचा.
“पावन चुना हाय काय ?”
माझ्या पाठीपागून आवाज आला. आवाज इतका धीर गंभीर आणि जरबेचा होता मी जवळ जवळ दचकलोच.
मागे वळून पहिले तर साडे पाच ते पावणे सहा फूट उंची, पिळदार शरीर, काळा सावळा रंग, अंगात साधा अंगरखा, धोतर, कानात बाळी, पायात तोडा असलेला चाळीस पंचेचाळीस च्या आसपास वयाचा माणूस उभा होता. गळ्यातील तुळशी माळे वरून वारकरी वाटत होता. त्या धूसर अंधारात सुद्धा उठून दिसावे असे सौंदर्य आणि तेज होते.
“मी तंबाखू खात नाही”
“मी तरी कुठे खातो पण बोलायला कारण म्हणून विचारले, द्या टाळी”,
त्याने असे म्हणत शांतता चिरणारे गगनभेदी हास्य केले.
मला काहीच कळेना, खरं तर मला माझ्या जवळ आता कोणीच नको होते.
‘अहो या पंढरीत टाळ आणि टाळी याला नाही म्हणायचे नाही. द्या हो’,
असे म्हणत त्याने हात पुढे केला. मी ही नाईलाजाने दिली टाळी.
‘गाव कुठलं’
‘मी इथंलाच’ आपसूक तोंडातून निघून गेले,
खरं तर मला एकांत हवा होता. पण मी उत्तर देखील नाईलाजाने देत होतो. वारकरी दिसत होता त्याला अगदीच कसे टाळायचे
“इथले कसे असाल, इथं कोण कायमचा राहायला आलाय”
“होय, पण पंढरी म्हणजे माहेरच वाटतंय”
“ते पण खरं हायं म्हणा, आणि एवढ्या रात्री कुठे फिरताय ? असं एकट्याने फिरू नये. तीर्थ क्षेत्र असलं तरी सगळे साव नसतात, नाहीतर एकटा बघून एखाद्या चोराशी गाठ पडायची”.
“हो खरं आहे. आलो होतो पाय मोकळे करायला”
“पण असं एकट फिरू नका, जावा झोप जावा सगळं पंढरपूर झोपलं आता”
“देव पण झोपले असतील आता “
“तो कसला झोपतोय”
“का, देव नाहीत झोपत “
“कशी लागल झोप, सगळ्यात मोठं ओझं असत ते देवत्वाच, ते घेऊन झोप कशी लागलं ? त्याच्या पण मनात विचार असतात, त्यालाही दुःख असत.”
“जो प्रत्यक्ष परमेश्वर आहे, सत्चिदानंद आहे, त्याला कसलं आलंय दुःख ? “
“असं तुम्हाला वाटतं पण देह भावना त्याला तरी कुठ चुकली” आपणाला चार तासाच्या दर्शन रांगेचा त्रास होतो. भक्तांसाठी अठ्ठावीस युगे एका विठेवर उभं राहून पाय भरून येत नसतील ? त्याच्या पण पायाला रग येते, पाय दुखायला लागले की, तो पण पाय मोकळे करायला फिरतो, त्याला पण कोणाशी तरी बोलून मन मोकळ कराव वाटतं.”
“असं खरंच असेल”
“मग, एकनाथाच्या घरी पाणी भरले, नामदेवाची खीर चाखली, चोखोबाची गुरे राखली, जनीचा सखा झाला, दामाजीचा वाली झाला, भक्ता सोबत वारीत चालला, त्याच्या सोबत फेर धरून नाचला, भजनात रंगला, नामात दंगला, आणि दिंड्या, पताका, एवढाच विठ्ठल माहित आहे तुम्हाला. त्याच्या भाव भावना, त्याचे मन, विरह,अगतिकता त्याच दुःख कधीच कोणाला कळत नाही.”
“तुम्ही कसं ओळखता ?”
“ओळखतो झालं , जो भक्ताचा भाव ओळखतो त्याच्या भावना कोणीतरी समजून घ्यायलाच हव्यात”
“तरटीचे झाड पहिले की, त्याला कान्होपात्राची आठवण येते. मोठ्या विश्वासाने आली होती. पण, माय बाप म्हणून तिला त्यान कवटाळण्याआधीच तिने मृत्यूला कवटाळले, त्याच्या डोळ्यांदेखत त्या राजस सुकुमार आणि पवित्र देहाची माती झाली. तरटीच्या झाडाला कितीही मीठी मारून बसले तरी ती परत येणार नाही. दिसणार नाही. याची जाणीव नसेल का त्याला. “
तुळशीच्या जिवंत देहाला नैतीकतेचं नातं देऊ शकला नाही. छातीवर तुळशीची माळ मिरवताना त्याच्या आतल्या हृदयातली सल कळेल कोणाला ?
तो कोणाचाच होऊ शकला नाही, ना तुळशीचा, ना राधेचा आणि जिच्या हृदयाचा स्वामी होता त्या रखमाईचा सुद्धा.
थोडा गैरसमज, थोडा रुसवा फुगवा संसारात व्हायचाच पण तो किती काळ टिकावा, एकाच छताखाली अठ्ठावीस युगांचा अबोला कसा सहन केला असेल. संसाराची किती सुंदर स्वप्न असतील रखमाईची. पण, हा मात्र जगाच्या संसारात गुरफटलेला आणि भक्तांच्या सहवासात रमलेला. कसे दिवस काढत असेल रखमाई, केवढा तो त्याग, जिला रखमाई कळली तिला बाईपण कळलं, संसाराचं मर्म कळलं. पण तिच्या हृदयाची भाषा त्याला कळत नाही, असं झालं असेल का कधी ? हे उमजून सुद्धा तो गेला का रखमाई च्या भेटीला ? संपवला का अबोला ? तिच्यावरील अन्याय केला का दूर ? त्याला ते सुद्धा जमलं नाही इतक्या युगात
विठ्ठल पंतांनी सपत्नीक देहांत प्रायश्चित घेतले. तरी ज्ञानोबा आणि त्याच्या भावंडांचा छळ संपला नाही. अमृताने शुद्धीसाठी गावभर फिरावं हे पाहताना त्याच्या मनाला यातना झाल्या नसतील का ?
तुकोबाच्या गाथा इंद्रायणीत बुडवताना त्याने तुकोबाला अडवलं नाही आणि धर्माच्या ठेकेदारांची समजूत काढली नाही. कसं वाटलं असेल त्याला. त्याच्या भक्तीत तल्लीन झालेल्या गोरोबाचं तान्हं पोर चिखलात गाडलं जाताना त्याच्या नामात दंग झालेला चोखोबा ढिगाऱ्या खाली गाडला जाताना तो फक्त पहात राहिला.
त्याच्या भक्तांनी परिस्थितीचा मार सहन केला. अपमान, अवहेलना, दारिद्र्य ,दैन्य, चारित्र्य हनन, सामाजिक बहिष्कार, त्याच्या नामस्मरणात असताना अस्पृश्य जगणं सारं काही सहन केलं आणि प्रसंगी मरण सुद्धा पत्करलं. हे सगळं त्या भक्तांनी एकट्याने सहन करताना त्यांना धीरासाठी, आधारासाठी त्याचा कमरेवरचा हात खाली आला नाही. त्याचे भक्त त्याच्यातलं देवत्व सिद्ध होण्याआधी महान झाले. त्याच्याच नामात आणि भक्तीत तल्लीन झालेल्या त्याच्या भक्तांच्या प्रेमाची उतराई करण्यात तो कमी पडला.
बोलत बोलता त्याचे डोळे पाणावले
“तुम्ही का रडताय”
“विश्वासाच्या धाग्यावर नाती निर्माण होतात, तो विश्वास जपण्यात कमी पडलं की, ती सल कायम मनात राहते आणि तसाच प्रसंग आला की मान शरमेने खाली जाते. पुंडलिक तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ, नामदेव, सोयरा, गोरोबा , चोखोबा, विठा, जनी, सखू, विसोबा, कान्होबा, सोपान, निवृत्ती, मुक्ता, दामाजी, कान्होपात्रा, सावत्या, दामाजी, बंका किती जणांची नाव घेऊ.
स्वतःच्या हातानी रक्ताचं पाणी करून फुलवलेला संसार एका क्षणात विसरून विठ्ठल भेटीच्या ओढीने वारीची वाट चालत वारकरी, त्याच्या वाट्याला आलेल्या दुःखाच्या चिखलावर फुगडी घालत, नाचत गात आनंदोत्सव साजरा करणाऱ्या भक्ताच्या ऋणातून मुक्त कसं व्हायचं ? जिवंतपणी मरण यातना आणि मेल्यानंतर देवत्व लाभलेल्या त्याच्या शापित भक्तांनी त्याच्या वरच्या प्रेमाखातर आणि प्रारब्धाच्या गोंडस नावाखाली सारं काही सहन केलं. तो हे सारं नाही थांबू शकत असून सुद्धा थांबवू शकला नाही. ही त्याची अगतिकता कोण समजून घेणार ?
मग ज्यांनी या संताना त्रास दिला, त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा का दिली नाही पांडुरंगाने .?
कसलं पाप आणि कसलं पुण्य ..
रात्री झोपताना दिवसभर केलेल्या कर्माची वाटलेली लाज आणि मनात निर्माण झालेला अपराधी भाव म्हणजे पाप आणि निरपेक्ष भावनेने दुसर्याला दिलेला आनंद म्हणजे पुण्य
प्रत्येकाचं पाप आणि पुण्यं ज्याच्या त्यांच्या सोबत
त्याच्याकडे कोणी प्रेमाने आला की तो त्याचा मग त्याच्या पायावर डोकं ठेवा त्याला मिठी मारा ,प्रेमाने केलेल्या स्पर्शाला विटाळ नसतो आणि त्याला तो होतही नाही. बाकी सगळा नियतीचा खेळ .त्यात ढवळा ढवळ करत नाही पांडुरंग.
तुम्ही त्याला इतकं कसं ओळखता
आपणच आपल्याला ओळखायचं असतं ज्याचं दुःख त्यालाच माहित, विषय कधीच संपत नाही.. लई उशीर झालाय जा झोपा आता. सकाळी आणि दर्शनाची इच्छा असेल तुमची ..
असं म्हणंत तो उठला
तो जाण्यासाठी वळणार एवढ्यात मी म्हटलं, थांबा नमस्कार करतो
असं म्हणून त्यांच्या पायावर डोके ठेवले
हाताला आणि कपाळाला तो स्पर्श ओळखीचा वाटला
हो तोच संध्याकाळी झालेला मंदिरातला
क्षणात देह भान हरपलं, पाय वाळूत आणि देह अंधारात विरून गेल्याचा भास झाला.
वर उठून पहिले तर तो सावळा देह मंदिराच्या दिशेने अंधारात नाहीसा झाला आणि उरला तो फक्त फक्त सावळ्या अंधारातला नीळा प्रकाश
भान हरपलेल्या अवस्थेत कसाबसा एकच शब्द फुटला.. विठ्ठला ..मायबापा
- प्रताप राजाराम पाटील…..✍
——————————————————————————