पंढरपूर : विशेष प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना अखंड दर्शन घेता यावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देवाचे सर्व पारंपरिक राजोपचार थांबवण्यात आले असून, मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवाच्या राजोपचारांची सांगता करण्यात आली असून, आता विठुराया व रुक्मिणीमातेचे २४ तास दर्शन घेता येणार आहे.
आज सकाळी ११ वाजता महानैवेद्यानंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य व कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत विठ्ठलाच्या पाठीमागे मऊ कापसाचा लोड लावण्यात आला. याचबरोबर रुक्मिणी मातेलाही शेणवटा जाणवू नये म्हणून तिच्या पाठीमागेही कापसाचा तक्क्या लावण्यात आला आहे.
यंदाची आषाढी खऱ्या अर्थाने विक्रमी होणार असून आजच देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरचे १४ पत्रा शेड भरून दूर पर्यंत पोहोचली आहे. या गर्दीवरून यंदा आषाढीचे सर्व विक्रम मोडीत निघणार असे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी भाविकांना झटपट दर्शन मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली टोकन दर्शन व्यवस्था आता यात्रा कालावधी संपेपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले आहे.
यात्रा काळात विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन घेताना भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे भाविकांना अखंड दर्शनाची सुविधा मिळावी या हेतूने ही परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही राबवली जात आहे.
यंदाच्या आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. पारंपरिक वारीनंतर एकादशीच्या पहाटे त्यांच्याच हस्ते ही महापूजा संपन्न होणार आहे.
वारकरी संप्रदायातील श्रद्धेचे प्रतीक असलेल्या या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. मंदिर समितीने केलेल्या व्यवस्थांमुळे भाविकांना रात्रंदिवस विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, भाविकांनी संयमाने व श्रद्धेने दर्शन घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
——————————————————————————————–