कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गोकुळमध्ये दौऱ्याच्या नावाने सुरू असलेले राजकारण, खर्चिक सहली आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या हितसंबंधांचे गणित हे येत्या निवडणुकीसाठीचं ‘डोळस नियोजन’ असल्याचे चित्र आहे. आता खऱ्या अर्थाने दूध उत्पादकांच्या हितासाठी काय केले जाते आणि काय दाखवले जाते, हे ओळखण्याची वेळ आली आहे.
गोकुळ दूध संघाच्या मागील निवडणुकीत ‘लक्ष्मी’चे दर्शन केवळ दोन्ही बाजूंनीच झाले नाही, तर मतदारांच्या मनावर प्रभाव टाकण्याचा एक नवाच शर्यतीचा अनुभव संपूर्ण जिल्ह्याने घेतला. सत्तांतराचे कारण विकास नव्हे, तर विशिष्ट नेत्याला संघातून दूर ठेवण्याचा हेतू होता, हे आता उघड सत्य झाले आहे.
संघातील सत्ताबदलाचा मुद्दा जनतेच्या हितासाठी करण्यात आला होता, असा दावा तत्कालीन विरोधकांनी केला होता. मात्र, हा सत्ताबदल जनतेच्या हितासाठी नव्हता, तर तो एक ‘राजकीय व्यूहचातुर्य’ होता, असा आज जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचा सूर आहे.
गोकुळ हे फक्त कोल्हापूर जिल्ह्याचाच नव्हे, तर राज्यातील एक महत्त्वाचा सहकारी दूध संघ आहे. १८ लाख लिटर दूध संकलन करणाऱ्या या संघाचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व मोठे आहे. त्यामुळे या संस्थेच्या सत्तेतील बदलांकडे संपूर्ण जिल्ह्याचे बारीक लक्ष असते.
सध्या गोकुळच्या सत्तेवर असलेले नवे संचालक मंडळ आणि त्यांच्या पाठिशी असलेले वारसदार ‘गोकुळ’चे अमूलशी स्पर्धात्मक रूपाने वर्णन करत आहेत. मात्र, अमूलसारख्या ब्रँडसह स्पर्धा करण्यासाठी केवळ आकडेवारी पुरेशी नाही, तर पारदर्शक कारभार, धोरणात्मक निर्णयक्षमता आणि शेतकरीहिताचे खरे भान आवश्यक असते. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अमूलसारख्या काही लाख लिटर संकलन करणाऱ्या संस्थेला स्पर्धा देण्याचे स्वप्न दाखवणे वेगळे आणि ते सत्यात उतरवणे वेगळे.
नव्या सत्ताधाऱ्यांनी गोकुळला केवळ ‘राजकीय हुकमी एक्का’ न बनवता एक ‘शेतकऱ्यांच्या हिताचे सामाजिक आंदोलन’ म्हणून पुढे नेले, तरच या परिवर्तनाला खरी दिशा मिळेल. अन्यथा हे सत्तांतरही एका व्यक्तीच्या सत्तेच्या हव्यासासाठीच होते, असा आरोप पुन्हा जनतेकडून होऊ शकतो.
“धूसफूस नको असाच विचार करत नेते आणि कारभारी एकत्र आल्याचा” दाखला देत, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने गेल्या सहा महिन्यांत तब्बल तीन वेळा अभ्यास दौरे केले आहेत. हे दौरे फक्त आणि फक्त दूध उत्पादकांच्या हितासाठीच असल्याचे गोकुळ प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात असले तरी, दूध उत्पादक मात्र यामागे काहीतरी वेगळाच हेतू असल्याची कुजबुज करू लागले आहेत.
———————————————————————————————–



