
कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
कागल येथील विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँक लि.च्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात बँकेच्या ७५ वर्षांच्या यशस्वी आणि सातत्यपूर्ण वाटचालीबद्दल शेतकरी, ठेवीदार, सभासद, कर्जदार आणि स्थानिक नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देऊन उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.
“महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या संस्था आज राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या परंपरेत विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँक ही एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आली आहे. गेल्या अनेक दशकांपासून बँकेनं आर्थिक प्रगती करत जनमानसात विश्वासार्हतेचा ठसा उमटवला आहे. शासन म्हणून जेव्हाही आमच्याकडून काही मदत लागेल तेव्हा आम्हीही कुठल्याही निधीची कमतरता भासू देणार नाही, तसंच बँकेची भविष्यातही ही यशस्वी घोडदौड अधिक वेगानं अशीच सुरू राहील”, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी बँकेचे संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असता त्यांनी आदमपूर येथील श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थानला सदिच्छाभेट देऊन बाळूमामांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीच्यावतीने पारंपारिक पद्धतीने काठी आणि घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.






