पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
पन्हाळा तालुक्यातील माले येथील ईगल क्रिकेट अकॅडेमी चा खेळाडू विरेन पाटील याची 16 वर्षाखालील वयोगटातून त्याची क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो नुकताच दुबई दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. त्याने क्रिकेट या खेळात आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. दुबई येथील शारजाह अबुधाबी येथे तो पाच एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळाच्या दर्जाचा त्याचा अभ्यास होणार आहे आणि तो त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार आहे. सध्या तो कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघांचे प्रतिनिधित्व करत आहे. यापूर्वी मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, रायगड, सांगली, सातारा येथे सामने खेळलाय. नुकत्याच रायगड, पनवेल येथे झालेल्या निमंत्रिताच्या स्पर्धेत जिल्हा संघाकडून खेळताना विरेन पाटीलने लक्षणीय कामगिरी केली आहे. दुबई दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल सर्व स्थरातून विरेनचे कौतुक होत आहे. त्याच्या कामगिरीचा गौरव म्हणून पन्हाळा तालुक्यातील माले येथील ग्रामपंचायतच्यावतीने विशेष सत्कार करून त्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी वीरेनला ईगल क्रिकेट अकॅडेमीचे आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सरपंच उत्तम पाटील, जयभवानी पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष सचिन जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात पाटील, स्वप्निल पाटील, ग्रामसेवक रायसिंग वळवी, ईगल क्रिकेट अकॅडेमीचे अध्यक्ष संजय जमदाडे, पतंग चौगुले,खंडेराव हिरवे पालक आणि खेळाडू उपस्थित होते.