कुरुंदवाड : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील कृष्णा- पंचगंगेचा पूर ओसरल्याने कृष्णानदीपलीकडील गौरवाडसह सात गावातील ग्रामस्थांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रासह तालुक्यातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गेल्या चार दिवसात शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल बारा फुटाने घट झाली आहे.
शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. तसेच विविध धरणातूनही म्हणावा तसा विसर्ग होत नाही तरीही तालुक्यातील कृष्णा पंचगंगेचे पाणी गेल्या पंधरा वीस दिवसापासुन पात्राबाहेर वाहत होते, तर नृसिंहवाडी मंदिरात २५ जुन व ४ जुलै रोजी असा दोनवेळा चढता दक्षिणद्वार सोहळा झाला होता.
कृष्णा नदी पलीकडील गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी या सात गावावर पुराची टांगती तलवार होती. आहे त्या परिस्थितीत जर पाऊस वाढला असता किंवा धरणातुन विसर्ग वाढवला असता तर येथे पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. परिणामी गौरवाडसह सात गावातील ग्रामस्थांमध्ये पुराची धाकधुक लागून राहीली होती. कारण ही सातही गावे कृष्णाकाठावरच वसली आहेत.
धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गेल्या चार दिवसात शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल बारा फुटाने घट झाली आहे. मंगळवार दि.८ जुलैपासून पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती. यावेळी राजापुर धरणाजवळ पाणी पातळी ३३ फुट ७ इंच होती.ती सोमवारी १४ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २१ फुट ०३ इंचावर आली. यानुसार या चार- पाच दिवसात तब्बल बारा फुटाने पाणी पातळीत घट झाल्याचे दिसून येते.
दरम्यान पूर ओसरत असला तरी अजूनही कोयना धरणातून २१०० क्युसेक,वारणा धरणातुन ४५०० क्युसेक विसर्ग सुरुच आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत कोयना धरणात ७४.३० टीएमसी,वारणा धरणात २७.८८ टीएमसी,तर अलमट्टी धरणात ९५.४७४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
—————————————————————————–