राधानगरी : प्रतिनिधी
पाटपन्हाळा धनगरवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर शेतकऱ्यांनी चर मारून तारेचे कुंपण घातलं आहे. धनगर वाड्यावरील विद्यार्थ्यांना शाळेकडे जाण्यासाठी हाच पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे धनगर वाड्यावरील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची शाळा बंद ठेवली आहे.त्यामुळे शाळा विद्यार्थ्यांअभावी १६ जुन पासुन बंद आहे. २५ जून पर्यंत रस्ता खुला करून शाळा सुरू न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा पाटपन्हाळा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे एक निवेदन गटविकास अधिकाऱ्यांकडे दिले आहे.
राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा धनगरवाड्याकडे जाणारा मार्ग काही शेतकऱ्यांनी चर मारून कुंपण घातलं आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना गावाबाहेर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. १६ जूनपासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत परंतु गावातील लहान मुलांना शाळेकडे जाता येत नसल्याने शाळा बंद आहे.याबाबत आज संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे यांना भेटून आमची शाळा बंद आहे तरीही पंचायत समितीसह गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या गोष्दुटीकडे दुर्लक्ष केलं आहे. मार्ग सुरू करून शाळा चालू न केल्यास २५ जूनपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांनी संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचांना बोलावून घेऊन याबाबत योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी सरपंच बाबुराव बोडके, संदीप बोडके, बजरंग बोडके, दादू गावडे, भागोजी बाजारी,दुहू बोडके, प्रकाश लांबोरे आदी उपस्थित होते.