पुणे ता.२४ : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
धर्मसुधारणेच्या आंदोलनांमध्ये मानवमूल्यांचा जागर महत्त्वाचा होता. रानडे, टिळक आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या त्रयींनी त्यांच्या स्वभाव, कार्यपद्धती व उद्दिष्टांच्या भिन्नतेतूनही धर्माला विवेक, तर्क व समता यांच्याशी जोडण्याचे कार्य केले. आजही त्यांचे विचार आपल्या समाजासाठी दिशादर्शक ठरतात,” असे अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक मत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘धर्मसुधारणेच्या दिशेने रानडे, टिळक आणि जोशी यांचे योगदान’ या विषयावर डॉ. लवटे यांनी विवेचन केले.
डाॅ. लवटे यांनी धर्मसुधारणेच्या ऐतिहासिक वाटचालीचा शतकोत्तर आणि तटस्थ आढावा घेतला. धर्म आणि समाज या संबंधाचा सखोल वेध घेत युरोपातील पुनर्जागरण (Renaissance) चा उल्लेख केला आणि बदलाची कालसापेक्ष जाणीव मांडली. समाजप्रबोधन आणि विवेकाधिष्ठित धर्मदृष्टी यामधील गुंतागुंतीचे स्तर त्यांनी उलगडून दाखवले. प्रत्येक समाजाच्या प्रगतीचा आलेख हा त्या समाजाने स्वीकारलेल्या मूल्यांवर अवलंबून असतो,” असे सांगत त्यांनी विविध देशांमध्ये राहिल्याचा आणि पाहिलेल्या वैयक्तिक अनुभवांचे उदाहरण देत मूल्याधिष्ठित जडणघडणीचा अभाव भारतात आजही जाणवतो, असे निरीक्षण मांडले.
डॉ. लवटे पुढे म्हणाले, “रानडे हे विधवा विवाह, स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय यासाठी कायदेमंडळातून लढणारे होते. टिळकांनी धार्मिक संस्कृतीला राजकीय आणि सामाजिक जनजागृतीसाठी वापरले. तर जोशींनी धर्मग्रंथांचे तात्त्विक विश्लेषण करून धर्माचे आधुनिक आणि विवेकाधिष्ठित रूप समोर आणले. स्वभाव, भूमिका आणि पद्धती भिन्न असूनही धर्माला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनवण्याचा प्रयत्न तिघांनी केला. लवटे यांनी या त्रयीतील कालसुसंगत सूत्रे उलगडत सध्याच्या सामाजिक परिस्थितीशी त्यांची सांगड घातली.
“आजही स्त्रियांचे प्रश्न, जातीभेद, अंधश्रद्धा हे मुद्दे त्या त्या स्वरूपात जिवंत आहेत. आपण ‘हर स्टोरी’ ऐकतो, पण ‘हर स्त्रीची स्टोरी’ पूर्ण होत नाही — कारण तिचा संघर्ष अजून संपलेला नाही,” असे म्हणत त्यांनी आजच्या समाजात विचारप्रवर्तनाची गरज अधोरेखित केली. तसेट शिक्षण धोरणावर भाष्य करताना त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरही टिप्पणी केली. आजच्या शैक्षणिक धोरणातही मानवी मूल्यांची जडणघडण हा विषय उपेक्षित आहे. ज्ञान आणि कौशल्याच्या मागे धावताना आपण माणूस घडवण्याच्या प्राथमिक उद्देशाला विसरत आहोत.”
सखोल निरीक्षण आणि चिंतनशील सादरीकरण –
डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे हे व्याख्यान केवळ माहिती देणारे नव्हते, तर एका अभ्यासू समाजसेवकाचे कालसापेक्ष आणि चिंतनशील निरीक्षण होते. ऐतिहासिक संदर्भ, तात्त्विक विश्लेषण, समकालीन वास्तव आणि वैयक्तिक अनुभव यांची गुंफण करत एक विस्तृत व विचारप्रवर्तक दृष्टिकोन श्रोत्यांपुढे ठेवताना त्यांनी १९९० नंतर आलेल्या सुबत्तेने आपला देश प्रबोधनाच्या दृष्टीने निष्क्रिय झालो आहोत याबाबत खंत व्यक्त केली.धर्मसुधारणेचा विचार मानवजडणघडणीकडे घेऊन गेला नाही तर याचा वैचारिक उपयोग फायद्याचा नाही असेही ते म्हणाले.
व्याख्यानानंतरच्या चर्चासत्रात अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली.यावेळी अभ्यासक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.