कोल्हापूर चित्रनगरी मधील विविध विकासकामांचे शनिवारी लोकार्पण

पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचे भूमिपूजन : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची उपस्थिती

0
196
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा, तसेच पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभ दिनांक २८ जून ला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध विकास कामांमध्ये रेल्वे स्टेशन चित्रीकरण स्थळ, नवीन वाडा, चाळ, मंदिर, अंतर्गत रस्ते, दोन वसतीगृहे इत्यादी कामांचा समावेश आहे. या कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. भविष्यातील बदलत्या तंत्रज्ञानाचा कल लक्षात घेता चित्रनगरीमध्ये सुसज्ज अशा पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.

या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास आणि भूमिपूजन समारंभास चित्रपट क्षेत्राशी निगडित कलाकार व मान्यवर तसेच नाट्य क्षेत्राशी निगडित कलाकार व मान्यवर यांना ही निमंत्रित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर चित्रनगरीमध्ये तीन चित्रीकरणे सुरु असून अनेक जाहिराती, मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण नियमितपणे या चित्रनगरीमध्ये होत आहे.

ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर चित्रनगरी मार्फत शाहू स्मारक येथे दिनांक २८ जून रोजी सायंकाळी सहा वाजता “चित्रसूर्य” या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे असून निवेदन श्रीरंग देशमुख व सीमा देशमुख करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये कार्तिकी गायकवाड, मयूर सुकाळे, अभिषेक तेलंग, माधुरी कुंभार, शेफाली कुलकर्णी, पियुषा कुलकर्णी हे नावाजलेले कलाकार सूर्यकांत यांच्या जीवनावर व त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवर गाण्यांमधून प्रकाश टाकणार आहेत.

चित्रनगरी मध्ये झालेल्या विविध विकास कामांचा थेट सकारात्मक परिणाम इथल्या रोजगारावर व कलाकार तंत्रज्ञ यांना मिळणाऱ्या विविध संधीवर होणार आहे. दिनांक 28 जून रोजी कोल्हापूर चित्रनगरी नागरिकांना पाहण्यासाठी नि:शुल्क खुली ठेवण्यात येत असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर चित्रनगरीमार्फत करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर चित्रनगरी मधील विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच चित्रसूर्य या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन कोल्हापूर चित्रनगरी तथा संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे व्यवस्थापकीय संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here