कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
प्रति तोळा एक लाख रुपये असा दर गाठणाऱ्या सोन्याच्या किमतीत मागील काही दिवसांपासून चढउतार सुरू आहे. अमेरिका-चीनमुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. आता अक्षय्य तृतीयेआधी या दरात घसरण झाली असून सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
ऐन लग्न सराई्च्या दिवसांत सोन्याचा दर वाढल्याने अनेकांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र, मागील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. अमेरिका-चीनमुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. आता अक्षय्य तृतीयेआधी आज सोन्याच्या किमतीत अचानक मोठी घसरण झाली. सोन्यासोबतच चांदीही आता स्वस्त झाली आहे. एमसीएक्सवर ५ जून २०२५ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ०.०७ टक्क्यांनी स्वस्त होऊन तो ९४, ९२६ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
५ मे २०२५ च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ०.४५ टक्क्यांनी घसरून ९६, ०११ रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी २२ एप्रिल रोजी सोन्याचा दर एक लाख रुपये प्रति १० ग्रॅम या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता, परंतु आज त्यात मोठी घसरण झाली आहे.
आजचे दर काय ?
अक्षय तृतीयेच्या दोन दिवसआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. रिटेल मार्केटमध्ये सोन्याचे दर १५०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. २४ कॅरेट सोन्याचे दर हा ९७ हजार १८३ प्रति तोळा इतका झाला आहे. २३ कॅरेट सोन्याचे दर ९३ हजार ४२५ प्रति तोळा इतका झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचे दर ८९ हजार ३४५ रुपये, २० कॅरेट सोन्याचा दर ८१ हजार २२४ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर हा ७३ हजार १०० प्रति तोळा इतका झाला आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारावर तणाव निर्माण झाल्यानंतर सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. जगातील दोन मोठ्या आर्थिक महासत्तेच्या वादाचा परिणाम जगातील घडामोडींवर झाला. आता मागील काही दिवसांपासून दोन्ही देशात ट्रेड वॉरवरून असलेला तणाव काहीसा निवळल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटली आहे. त्याच्या परिणानी सोनं स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय, अमेरिकन डॉलरचा भाव वधारला असून सोन्यावर दबाव वाढला आहे.
——————————————————————————————————