कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
युपीएससी (UPSC)परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पुण्याच्या अर्चित डोंगरे याने देशात तिसरा क्रमांक मिळवत महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात शक्ति दुबे या उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हा मराठी असून महाराष्ट्रात पहिला आला आहे.
अर्चित हा पुण्यातला रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाणेसह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये, मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.
युपीएससी परीक्षेत यंदाही मराठमोळ्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने ३०३ वा क्रमांक मिळवला आहे.
देशभरातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. जगभरातल्या कठीण परीक्षांमध्ये युपीएससीची ओळख होते. या परीक्षेच्या निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतात -प्रिलिम्स (पूर्वपरीक्षा), मेन्स (मुख्य) आणि मुलाखत.
तिन्ही टप्प्यांवर उमेदवाराचं मूल्यांकन करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
२०२४ च्या परीक्षेत ११३२ रिक्त जागा भरल्या जातील.
हे आहेत ‘टॉप १०’
१. शक्ती दुबे
२. हर्षिता गोयल
३. अर्चित डोंगरे
४. मार्गी शहा
५. आकाश गर्ग
६. कोमल पुनिया
७. आयुषी बन्सल
८. राज कृष्ण झा
९. आदित्य विक्रम अग्रवाल
१०. मयंक त्रिपाठी
यावर्षी किती जणांची निवड झाली?
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि केंद्रीय सेवा, गट ‘A’ आणि गट ‘B’ मध्ये नियुक्तीसाठी एकूण १,००९ उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे.
अंतिम निवड झालेल्या उमेदवारांमध्ये ३३५ उमेदवार हे सामान्य प्रवर्गातील आहेत.
१०९ उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट (EWS )मधील आहेत.
३१८ उमेदवार ओबीसी प्रवर्गातील आहेत.
१६० उमेदवार अनुसूचित जाती या प्रवर्गातले आहेत.
८७ उमेदवार हे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आहेत.
सविस्तर निकाल युपीएससी (UPSC) -upsc.gov.in या अधिकृत वेबसाईट वर पहायला मिळेल.
——————————————————————————————–