मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( NPCI ) ने यूपीआय ( युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ) व्यवहारांसाठी महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या बदलांमुळे डिजिटल पेमेंट अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. नवीन नियम १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील. व्यक्ती ते व्यापारी ( P2M ) व्यवहारांसाठी मर्यादा वाढवण्यात आली असून व्यक्ती ते व्यक्ती ( P2P ) व्यवहारांसाठी मर्यादा पूर्ववत ठेवण्यात आली आहे.
नेमके कोणते बदल झाले आहेत ?
-
भांडवली बाजार गुंतवणूक आणि विमा : पूर्वी एका व्यवहारासाठी जास्तीत जास्त ₹ २ लाख रकमेंपर्यंत व्यवहार शक्य होते. आता ते वाढून ₹ ५ लाख झाले असून दैनिक मर्यादा ₹ १० लाखांपर्यंत वाढली आहे.
-
सरकारी ई-मार्केट प्लेस आणि कर भरणा : प्रति व्यवहार मर्यादा ₹ १ लाखांवरून ₹ ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
-
प्रवास बुकिंग : विमान, ट्रेन किंवा इतर प्रवास सेवा बुक करताना आता प्रति व्यवहार ₹ ५ लाख आणि दैनिक ₹ १० लाख मर्यादा लागू असेल .
-
क्रेडिट कार्ड बिल पेमेंट : एका वेळेस ₹ ५ लाखांपर्यंत व्यवहार करता येईल, तर दैनिक मर्यादा ₹ ६ लाखां पर्यंत वाढली आहे.
-
कर्ज आणि ईएमआय : पूर्वी प्रति व्यवहार ₹ ५ लाखांपर्यंत व्यवहार शक्य होता, तो आता ₹ १० लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
-
दागिन्यांची खरेदी : प्रति व्यवहार मर्यादा ₹ १ लाखांवरून ₹ २ लाखांपर्यंत वाढली आहे, आणि दैनिक मर्यादा ₹ ६ लाखांपर्यंत असेल.
-
मुदत ठेव : आता तुम्ही एका व्यवहारात ₹ ५ लाखांपर्यंत ठेव जमा करू शकाल, जी आधी ₹ २ लाख होती.
-
डिजिटल खाते उघडणे : यामध्ये कोणताही बदल नाही. मर्यादा पूर्वीप्रमाणे ₹ २ लाख राहणार आहे.
-
परकीय चलन पेमेंट : लवकरच प्रति व्यवहार आणि दैनिक मर्यादा ₹ ५ लाखांपर्यंत वाढवली जाणार आहे.
या बदलांचा फायदा काय ?
-
मोठ्या व्यवहारांसाठी बँकांमध्ये जाण्याची गरज कमी होईल.
-
गुंतवणूक, विमा, कर्ज, प्रवास यांसारख्या सेवा डिजिटल पद्धतीने अधिक वेगाने आणि सुरक्षितरीत्या करता येतील.
-
व्यवसाय आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार जलद आणि कॅशलेस होतील.
-
आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सुविधा वाढेल.