अंगठ्याने होणार UPI पेमेंट !

स्मार्टफोनशिवाय डिजिटल व्यवहार सुलभ

0
106
Startup company 'Proxy' has started preparations to launch a unique thumb payment facility called ThumbPay.
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

देशात डिजिटल पेमेंटचा झपाट्याने होत असलेला प्रसार लक्षात घेऊन आता स्मार्टफोन नसलेल्या पण बँक खाते असलेल्या नागरिकांसाठीही नवी सोय उपलब्ध होणार आहे. स्टार्टअप ‘प्रॉक्सी’ कंपनीने ThumbPay या नावाने अंगठ्याच्या साहाय्याने पेमेंट करण्याची अनोखी सुविधा बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे.

कशी आहे ThumbPay पेमेंट प्रक्रिया ?

ThumbPay चा वापर ग्राहकांना अगदी सोप्या पद्धतीने करता येईल. यासाठी फक्त अंगठा डिव्हाईसवर ठेवावा लागेल. डिव्हाईस अंगठ्याचा ठसा स्कॅन करून **आधार सक्षम पेमेंट सिस्टिम (AEPS)**च्या आधारे ग्राहकाची ओळख पडताळेल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर UPI प्रणालीमार्फत थेट बँक-टू-बँक पेमेंट होईल. या व्यवहारासाठी स्मार्टफोन, QR कोड किंवा रोख रक्कमेची गरज भासणार नाही, ही मोठी सोय मानली जाते.

वैयक्तिक सुरक्षेचे प्रश्न

ही सुविधा डिजिटल व्यवहारासाठी उपयुक्त असली तरी ग्राहकांच्या वैयक्तिक सुरक्षेबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत. अंगठ्याच्या ठशांच्या डेटाचा गैरवापर होणार नाही याची शाश्वती काय, असा प्रश्न काही तज्ज्ञ उपस्थित करत आहेत. कंपनीने मात्र UIDAI आणि NPCI यांच्या सुरक्षा उपाययोजना आणि नियमांनुसार सर्व प्रक्रिया राबवल्याचे स्पष्ट केले आहे. ThumbPay डिव्हाईसवर छोट्या कॅमेऱ्याद्वारे व्यवहाराची नोंद ठेवली जाईल, पण अंगठ्याच्या ठशांचा डेटा सुरक्षित राहील, असा कंपनीचा दावा आहे.

हे ThumbPay डिव्हाईस खरेदीसाठी सुमारे २ हजार रुपये खर्च येतो. बॅटरीवर चालणारे हे मशीन मोठ्या शोरूमपासून ग्रामीण भागातील लहान दुकाने, पेट्रोल पंप, मॉल्स अशा सर्व ठिकाणी सहज बसवता येणार आहे. यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. आधारशी जोडलेल्या बँक खात्याशी हे डिव्हाईस जोडले गेले की ग्राहकांचा अंगठा ठेवताच पेमेंट प्रक्रिया पूर्ण होते.

UIDAI आणि NPCI कडून अंतिम सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर ThumbPay उपकरण बाजारात दाखल होणार आहे. भारतात आधीच UPI पेमेंट प्रणाली जगाला दिशा दाखवत असताना आता स्मार्टफोनशिवाय अंगठ्याने होणारे पेमेंट ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला नवे बळ देणार आहे.

——————————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here