कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील विविध भागांमध्ये सोमवारपासून अवकाळी पावसाने जबरदस्त हजेरी लावली असून, यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या चारही प्रमुख विभागांना मोठा फटका बसला आहे. एकीकडे मान्सूपूर्व वातावरणात झालेल्या या पावसाने काही भागात दिलासा दिला असला, तरी त्याच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला.
हवामान अंदाज –
हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुन्हा पाऊस हजेरी लावणार आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होईल. या पट्ट्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मान्सूनपूर्वी शेतीची मशागत खोळंबली आहे.
- अमरावती जिल्ह्यात अचलपूर, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा या चार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.
- जालना, हिंगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे.
- पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वीज पुरवठ्यावर परिणाम –
अनेक भागांमध्ये वीज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्रामीण भागात वीज वाहिन्या तुटल्या, तर शहरात तांत्रिक बिघाडामुळे अनेक तास वीज गायब होती. अनेक गावांत रात्री अंधारातच जनजीवन सुरू होते.
झाडे उन्मळून पडली –
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यांवर पडली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. काही भागांत घरांवर झाडे पडल्याने मालमत्तेचे नुकसान झाले. शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पुणे विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ अवघ्या एका तासात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
शेतीचे मोठे नुकसान –
अवकाळी पावसामुळे शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके भिजून गेलेली असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
शासनाची तातडीने दखल –
राज्य सरकारकडून तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून संबंधित जिल्ह्यांमध्ये मदतकार्य सुरू असून, मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.
नाशिकसाठी पावसाचा दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकला २२ मे आणि २३ मे रोजी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई वेधशाळेकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १९ ते २५ मे दरम्यान राज्यात पावसाचा जोर असल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर महाराष्ट्राला सु्द्धा पावसाने झोडपले आहे. मनमाड रेल्वे स्टेशनवर गळती दिसून आली. तर जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने मोठा दणका दिला आहे.
——————————————————————————————