कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ( ठाकरे गट ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने मधील संभाव्य युती बाबत एक मोठी चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का ? या विषयी तर्क वितर्क लढवले जात असतानाच आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वर माध्यमांशी संवाद साधताना यावर महत्त्वाचे भाष्य केले.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राजकीय गणिते नेहमी बदलत असतात. ज्यांच्याशी मतभेद होते, त्यांच्याशीच कधी सहकार्याची वेळ येते. मात्र, अजून काही ठरलेले नाही. विचारधारा आणि धोरणे यांचा सुसंवाद झाला, तर पुढे काय होईल ते पाहू.”
आज मातोश्रीवर संवादाच्या निमित्ताने काही महत्त्वपूर्ण पक्ष प्रवेशही झाले. काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेविका सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिकांनी देखील पुन्हा पक्षात पुनरागमन केले. यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा बळ मिळाले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसोबत युती शक्यतेच्या चर्चांमुळे राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्याकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी पुढील काही दिवसात या दोन्ही पक्षांच्या हालचालींवर संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार हे निश्चित.



