बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करत शिवसेनेच्यावतीने पाटणे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे यांनी केले. रस्त्याची दयनिय अवस्था, अपघातांची मालिका, प्रशासनाची उदासिनता विरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं आहे.
बेळगाव – वेंगुर्ला या मार्गावर सध्या वाहतुकीच्या प्रमाणात वाढ होत आहे. कोकणात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. पर्यायाने वाहनांची सुद्धा संख्या वाढत आहे. यामुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. याचबरोबर या रस्त्यांची अवस्था देखील दयनिय झाली आहे. याबाबत शासनाची असणारी उदासिनता लक्षात घेऊ आज चंदगड तालुक्यातील पाटणे फाट्यावर शिवसेना ठाकरे गटाने रास्ता रोको आंदोलन केले केलं आहे.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे यांनी “वर्षभरात रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना सैल सोडणार नाही. चंदगड तालुक्याची ओळख जिल्ह्यात न्हवे तर महाराष्ट्रात असून या बाबतीत प्रशासन एवढं उदास का?” उपस्थित केला. चंदगड तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असून, अपघाताना शासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रश्नी रस्त्यावर उतरुन उग्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
चंदगड विधान सभा प्रमुख राजू रेडकर, ऍड. संतोष मळवीकर यांनीही आरोपांना समर्थन केलं. तर शिवसेचे विष्णू गावडे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने यांचीही भाषणे झाली. आंदोलनामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आंदोलनकर्त्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. मुल्ला यांनी स्वीकारले. या प्रसंगी अवधूत पाटील, किरण नागुर्डेकर,उदय मंडलिक,महेश पाटील, भरमु बिर्जे,कार्तिक सुतार, दयानंद रेडेकर,अशोक पाटील,अनिल फडके,अनिल फडके, मोहनगेकर,अवधूत भुजभळ, ज्ञानेश्वर माने,तानाजी पाटील,मनोज रावराणे,कल्लाप्पा सुळेभावकर,प्रवीण कोळसेकर, शिवा अंगडी, बाबू चौगले,श्रीधर भाटे, कल्पेश पाटील, तुकाराम पाटील, उपस्थित होते.