नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, आज त्यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या परराष्ट्र नीतीवर जोरदार टीका केली. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प मोदींची खिल्ली उडवत आहेत
“अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयाचा फटका थेट भारतातील सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींची थट्टा करत आहेत, त्यांची खिल्ली उडवत आहेत. पण आपला देश एक अक्षरानेही उत्तर देत नाही. जाब विचारणं सोडा, देशाचं सरकार चालवतंय कोण ? ” असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केला.
पंतप्रधान देशाचे असते तर पहलगामला गेले असते
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, “शिवसेनेच्या वर्धापन दिनी मी स्पष्ट मत मांडलं होतं. देशाला पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्र्यांची गरज आहे. सध्या हे सर्व भाजपकडे आहेत. पण पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान बिहारमध्ये प्रचार करत होते. एखादा खरा पंतप्रधान असता, तर पहलगामला गेला असता. पण हे सरकार केवळ प्रचारात व्यस्त आहे. पंतप्रधान देशाचे असतात, पक्षाचे नव्हे.”
परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी
“अमेरिका भारतावर दबाव आणते, तेव्हा मोदी चीनमध्ये जातात. चीनलाही नवे दरवाजे उघडून देण्यासाठी गेलेले असतात. एकूणच हे सरकार परराष्ट्र नीतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोणतंही खंबीर धोरण त्यांच्या जवळ नाही. हे सरकार असफल, अपयशी आणि असहाय आहे” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
देशात अघोषित एनआरसी ?
प्रत्येक राज्याच्या निवडणुका वेळेनुसार होतील. बिहारमध्ये मतदार याद्यांचा घोळ झाला. स्वतची ओळख मतदारांनी पटवून द्यायची असं त्यात आहे. म्हणजे देशात अघोषित एनआरसी लागू झाला का. सीए आणि एनआरसी चा विषय पेटला होता. दिल्लीत त्यावर आंदोलन झालं होतं. तुम्ही तुमची ओळख पटवून द्या असं म्हटलं होतं. त्यामुळे वाद झाला होता. आता निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर द्यावं, असं उद्धव ठाकरे यांनी खडसावलं.
मग ईव्हीएमचे व्हीव्हीपॅट का काढलं?
ईव्हीएम वर आक्षेप असताना व्हीव्हीपॅट काढलं, असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. अपारदर्शकता आणलं. मग निवडणूक घेता कशाला. यांचे एवढे निवडून आले ते थेट जाहीर करा. आमचं मत आम्हाला कळत नाही. रजिस्टर कुठे होतं हे कळत नाही. बॅलेट पेपरवर मतदान करताना ठसा लावल्यानंतर माझं मत कुठे आहे कळायचं. आता व्हीव्हीपॅट काढलं जात आहे. मग निवडणूक घेताच कशाला, असा अचूक निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला.
दिल्ली दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती, शिंदेंची भेट, आणि आता परराष्ट्र धोरणावर केलेली ही टीका हे सर्व मिळून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचालींचा संकेत देत आहेत.
——————————————————————————————-