मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यात हिंदी सक्तीवरून राजकारण करणाऱ्या शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्रिभाषेचा अहवाल २०२२ मध्ये स्विकारला होता, असा पलटवार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला. आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरेंचे मराठी प्रेम बेगडी असल्याची जोरदार टीका केली. राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा तापला आहे. मनसे आणि शिवसेनेने (ठाकरे) यांनी हिंदी विरोधात आक्रमक भूमिका घेत, आंदोलनाचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी गुरुवारी बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीबाबतचे उद्धव ठाकरेंचे मुद्दे खोडून काढले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री होते. याकाळात डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्रिभाषीय अहवाल तयार केला होता. तो तत्कालीन कॅबिनेट बैठकीत ठाकरेंनी स्वीकारला. या अहवालात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचा उल्लेख होता. त्यामुळे मराठी भाषेवर प्रेम सांगणाऱ्यांनी तेव्हा हा त्रिभाषिक अहवाल का स्वीकारला? असा सवाल सामंत यांनी उपस्थित करत ठाकरे यांच्यावर टीका केली. मराठी आणि मराठी माणसाबद्दल त्यांच्या मनात प्रेम नाही. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे हिंदी सक्तीचे आणि मराठीवरून राजकारण करत आहेत, असा आरोप केला.
राज्य सरकार हिंदी भाषेचा आग्रह किंवा अनिवार्य देखील केलेला नाही. परंतु दोन-तीन वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांनीही मराठी, इंग्रजी आणि तिसऱ्या भाषेचा पर्यायाबदल भूमिका मांडतानाचा जुना व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला. तिसऱ्या भाषेबद्दल त्यांची तेव्हा भूमिका होती तर आता भूमिका का बदलली? की फक्त निवडणुकीच्या तोंडावर त्यांची भूमिका बदलली, अशी टीका सामंतांनी आदित्य यांच्यावर केली. मराठी माणसाबद्दल बोलत आहेत. पण त्यावेळी विरोध केला असता तर आज ही वेळ आली नसती, असेही त्यांनी सांगितले. सरकारने कुठेही हिंदी भाषा सक्ती आहे, असा उल्लेख केलेला नाही. उलट विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली असून साहित्यिक, लेखक, कवी मराठी भाषेची अभ्यासक, तज्ञ जाणकार यांची मते घेऊन हिंदी भाषेबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे सामंत म्हणाले.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन शासनाचे धोरण आणि भूमिका समजून सांगितली. परंतु सरकारचे धोरण अमान्य असल्याचे राज म्हटले. तसेच त्यांनी ६ जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. सर्वपक्षीयांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. राज यांचा हेतू हा मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषेसाठी आहे, असे सामंत यांनी सांगितले. तर दुसरीकडे काही जण राजकारण आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ७ जुलैला मोर्चा काढत आहेत, असा निशाणा साधला.