मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्राने वीज क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली असून, येत्या काळात अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचे महत्त्व आणि आवश्यकता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, उदंचन जलविद्युत प्रकल्प (Pump Storage Project) हा उपयुक्त आणि महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात पहिल्यांदाच सहकार क्षेत्रातून अशा प्रकारचा पंपस्टोरेज प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा करार झाला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विनय कोरे, संबंधित अधिकारी आणि वारणा परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते.
२४० मेगावॉट वीजनिर्मिती; १००८ कोटी गुंतवणूक
या तिल्लारी प्रकल्पातून तब्बल २४० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. यासाठी १००८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, जवळपास ३०० लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे.
कोदाळी ते केंद्रे धरणांमधून प्रकल्प
या प्रकल्पासाठी वरील बाजूचं धरण कोदाळी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) आहे, तर खालील बाजूचं धरण मौजे केंद्रे (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) इथं आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा विकास आणि ऊर्जेचं उत्पादन एकाचवेळी साध्य होणार आहे.
सहकार क्षेत्राचा ऐतिहासिक टप्पा
आमदार विनय कोरे म्हणाले, “तात्यासाहेब कोरेंचं स्वप्नं होतं की सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे. आज वारणा संस्थेच्या पुढाकारातून हा प्रकल्प होतोय, याचा आनंद आहे. हा प्रकल्प केवळ ऊर्जा निर्मितीचा नाही, तर रोजगार, जलसंधारण आणि विकासाचाही आहे.”
हा प्रकल्प म्हणजे केवळ वीजनिर्मिती नव्हे, तर कोल्हापूर-सिंधुदुर्गच्या विकासाला नवी चालना देणारी मोठी घडामोड आहे.
——————————————————————————————–