Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी नुकताच  भारताचा दौरा केला असून राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा तिसरा भारत दौरा ठरला आहे.

या दौऱ्यादरम्यान भारत-यूएई धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर शेख मोहम्मद बिन जायद यांच्या अतिशय भव्य संपत्तीची आणि राजेशाही जीवनशैलीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

‘MBZ’ या नावाने ओळखले जाणारे शेख मोहम्मद बिन जायद हे जगातील सर्वात श्रीमंत शाही व्यक्तींमध्ये गणले जातात. विविध आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार त्यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे 30 अब्ज डॉलर (अंदाजे 2.7 लाख कोटी रुपये) इतकी आहे. ही संपत्ती त्यांना वारसाहक्क, तेल महसूल आणि जागतिक स्तरावरील गुंतवणुकीतून मिळाली आहे. बँकिंग, ऊर्जा, रिअल इस्टेट आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे.

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, अल नाहयान राजघराणे हे जगातील सर्वात श्रीमंत शाही कुटुंब मानले जाते. या कुटुंबाची एकत्रित संपत्ती 300 अब्ज डॉलरहून अधिक असून जगातील सुमारे 6 टक्के तेल साठ्यावर या कुटुंबाचे नियंत्रण आहे. हे कुटुंब अबू धाबीवर राज्य करते.

यूएईतील राष्ट्राध्यक्ष निवासस्थान ‘कास अल वतन’ हा या राजघराण्याच्या वैभवाचा प्रतीक मानला जातो.

सुमारे 475 मिलियन डॉलर किमतीचा हा भव्य महाल 3.8 लाख चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेला असून तो आकाराने पेंटागनपेक्षा तिप्पट आहे.

पांढऱ्या ग्रॅनाइटने बांधलेला हा महाल, 37 मीटर रुंद घुमट आणि सुमारे 3.5 लाख क्रिस्टल्सच्या झुंबरामुळे विशेष ओळखला जातो.

याशिवाय पॅरिसमधील ‘शॅटो डी बॅलोन’सारख्या अनेक आलिशान मालमत्ताही या कुटुंबाकडे आहेत.

अबू धाबीच्या शाही कुटुंबाकडे गाड्यांचा भव्य ताफा असून यूएई आणि मोरोक्कोतील चार संग्रहालयांमध्ये या कार्स ठेवण्यात आल्या आहेत. मीडिया अहवालांनुसार, शेख हमद बिन हमाद अल नाहयान यांच्याकडे एकट्यांकडेच 700 पेक्षा अधिक कार्स आहेत. तर शेख मन्सूर यांच्या कलेक्शनमध्ये बुगाटी व्हेरॉन, फेरारी, मॅकलारेन आणि लॅम्बोर्गिनीसारख्या दुर्मिळ सुपरकार्सचा समावेश आहे.

याशिवाय या राजघराण्याकडे आठ विमानांचा ताफा असून त्यात एअरबस A320-200 आणि बोईंग 787-9 सारख्या अत्याधुनिक विमानांचा समावेश आहे.

राष्ट्राध्यक्षांचे खाजगी बोईंग 747 विमान सुमारे 478 मिलियन डॉलर किमतीचे असल्याचे सांगितले जाते. समुद्रातील ऐश्वर्याचे प्रतीक असलेली जगातील सर्वात मोठी सुपरयॉट ‘अझम’ (590 फूट लांब) हेदेखील याच कुटुंबाच्या मालकीची आहे.

तेल आणि प्रॉपर्टीव्यतिरिक्त अल नाहयान कुटुंबाची गुंतवणूक फेरारी, डेमलर एजी, रिहानाचा ‘सॅव्हेज एक्स फेंटी’ ब्रँड आणि एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ सारख्या जागतिक कंपन्यांमध्येही आहे.

एकीकडे भारत-यूएई संबंधांना नवी दिशा देणारा दौरा, तर दुसरीकडे शेख मोहम्मद बिन जायद यांची अफाट संपत्ती आणि शाही जीवनशैली या दोन्ही कारणांमुळे MBZ सध्या आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here