कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कपाळावर टिळा… गळ्यात तुळशीची माळ अन् मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी. महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी. संतांची शिकवण म्हणजे वारी. ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी.
विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी. घरुन निघायचे. एखाद्या संताच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठूरायाचे दर्शन ‘याची देही याची डोळा घेणे’ म्हणजे वारी. १८ ते २० दिवस सर्व संसारिक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या धान्यात राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहे. ही वारी कधी चुकायची नाही…असे म्हणणारे वैष्णव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. काय आहे ही वारी. कधी अन् कशी सुरु झाली वारीची परंपरा. वारी आणि दिंडीमधील फरक काय, राज्यभरातून किती दिंड्या निघतात…जाणून घेऊ या सर्व माहिती या महाराष्ट्रातील अनोख्या परंपरेची.
वारीचा इतिहास खूप दीर्घ आहे. भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी वारी सुरु झाली. हे विश्वच माझे घर हा संदेश देण्यासाठी वारी सुरु झाली. वारी नेमकी कधी सुरु झाली ? त्याचा नेमका उल्लेख नाही. परंतु संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगामध्येही वारीचा उल्लेख आहे, असे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी म्हटले आहे. वारी करण्याची परंपरा साधारणतः ८०० वर्षांहून अधिक काळापासून आहे.
ऐतिहासिक संदर्भांमध्ये १३ व्या शतकापासून वारीचे संदर्भ आणि पुरावे मिळतात. परंतु वारी त्यापेक्षा प्राचीन आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्थ आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज भानुदास मोरे म्हणतात, वारी आदी शंकाराचार्यापासून सुरु झाली. पांडुरंग जेव्हा पांडुरंग अवतारात आले. तेव्हापासून वारी सुरु झाली. त्यानंतर पालखी सोहळा सुरु झाला. पुंडलिकामुळे विठ्ठल पंढरपूरमध्ये आले. त्यानंतर वारीची पद्धत सुरु झाली. परंतु हे कोणी घालून दिली त्याची काहीच माहिती नाही. एका सिद्धांतानुसार, वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यांत पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली.
विठ्ठल पंढरपुरात आले तरी कसे ?
विठ्ठल आणि पंढरपूर यासंदर्भात तीन पुराणांमध्ये उल्लेख आला आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णुपुराण यामध्ये विठ्ठलाचा उल्लेख आहे. भगवान विष्णू रुसलेल्या माता रुख्मणी यांची समजूत काढण्यासाठी दिंडीरवन म्हणजे आजच्या पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांना आपला भक्त पुंडलिक यांची आठवण झाली. भगवंत स्वत: मग पुंडलिक यांच्या दारी पोहचले. तेव्हा पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत होते. त्यांना घरी कोणीतरी आले आहे, हे कळाले. त्यांनी मागे वळून पाहिल्यावर साक्षात परब्रम्ह भगवान विष्णू दाराशी आलेले दिसले.
भगवंत पुंडलिक यांना आवाज देत होते. मग पुंडलिक यांनी त्यांच्याजवळ असलेली एक विट फेकली आणि देवाला म्हणाले, “या विटेवर उभा राहा. माझी आई-वडिलांची सेवा झाली की, मी तुमच्या दर्शनाला येतो.” भगवान विष्णू त्या विटेवर उभे राहिले. त्यानंतर आई-वडिलांची सेवा झाल्यावर पुंडलिक भगवंताकडे आले. त्यांनी भगवंताची क्षमा मागितली. परंतु भगवंत तर आपल्या भक्तावर प्रसन्न झाले होते. त्यांनी पुंडलिक यांना हवे ते वर मागण्यास सांगितले. भक्त पुंडलिक यांनी भगवंतांना त्याच विटेवर त्या ठिकाणी राहावे, अशी विनंती केली. मग भगवंत विटेवर पांडुरंग बनून, विठ्ठल बनून उभे राहिले. त्याच पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीच्या माध्यमातून आषाढी अन् कार्तिकी वारीला लाखो भक्त राज्यभरातून जातात.
————————————————————————————————–






