श्री तुळजा भवानी,तुळजापूर गाव आणि तिच्या गूढ गोष्टी व माहित नसलेल्या प्रथा परंपरा..भाग – ५

सकाळी पोळी, संध्याकाळी नळी

0
30
Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क :

इथल्या जवळपास सगळ्या घरांत रोजच सकाळी पोळी व संध्याकाळी ‘नळी’ (मटण) हे ठरलेले असते. त्यामुळे हे गावच जणू खाद्यसंस्कृतीवर पोसलेले वाटते. आषाढ, श्रावण, भाद्रपद या महिन्यांत मांसाहार न करणारे बरेच असतात. शिवाय फारशी यात्राही नसते. त्यामुळे भोप्यांच्यासाठी हे दिवस तसे कंटाळवाणेच असतात. त्यामुळे वर्षांच्या बारा महिन्यांपकी आठ महिने खाणे चालू असते तर बाराही महिने ‘पिणे’ सुरू असते. यात्रा नसलेले चार महिने वा विशिष्ट दिवस, याला त्यामुळेच ही मंडळी ‘खाडे’ दिवस म्हणतात. इथे जेवणाची आमंत्रणे देण्याचीही एक खास स्टाइल आहे. सायकलवरून देशमुखांच्या घरचा माणूस पाटलांच्या घरी आमंत्रण देण्यासाठी गेल्यावर, दारातूनच आत मोठय़ा आवाजात हाळी देतो, ‘आमंत्रण खालच्या घरच्या देशमुखांचे, घ.म.’ म्हणजे ‘घरातील सर्व मंडळी’.

तुळजापूरला येणारे भक्त हे केवळ दर्शनासाठी येणारे जसे असतात तसेच नवसपूर्तीसाठी येणारेही असतात. घरात शुभकार्य, विशेषत: लग्न झाल्यानंतर परंपरागत जे कुलधर्म कुलाचार असतात, त्यापकी एक म्हणजे गोंधळ. देवीचा गोंधळ पूर्वी आपल्या घरातच घालण्याची प्रथा होती. पण आता फ्लॅट संस्कृती, जागेची अडचण, शेजाऱ्यांना होऊ शकणारा त्रास, छोटय़ा जागेत सगळे नातेवाईक, इष्टमित्रांची न मावणारी संख्या, होणारा खर्च या सगळ्यांचा विचार करून आजकाल सगळेजण देवळातच गोंधळ घालणे पसंत करतात. त्यातही तुळजाभवानी ही अनेकांची कुलदेवता असल्याने हा गोंधळ शक्यतो तिथेच जाऊन करण्याची पद्धत आता हळूहळू रूढ झाली आहे. घरात घालायचे गोंधळ शक्यतो रात्रीच घालावे लागतात, पण देवस्थानात दिवसभर हे विधी सुरूच असतात, ही सोयही लोकांच्या पथ्यावर पडते. गोंधळी गीते, त्यातील गण, गौळण हे सगळे म्हणजे लोकसाहित्याचा एक आगळावेगळा प्रकारच म्हणायला हवा. परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आलेले ज्ञान म्हणा किंवा अलिखित अशी मौखिक संस्कृती आहे त्यालाच लोकसाहित्य म्हणता येईल. हे केवळ अशिक्षित अप्रगत लोकांतच असते असे नाही, तर ते सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांतही प्रचलित असते.

गोंधळ गीतांचा ठेवा गोंधळी समाजाकडून जपला जात असला तरी ते परंपरागत व्यवसाय म्हणूनच पाहतात. त्या समाजातील सुशिक्षित तरुण या व्यवसायाकडे पाठ फिरवून आहे. पण त्यालाही काही अपवाद आहेत. पर्याय नसल्याने हा व्यवसाय करणारेही बरेच आहेत. तसेच यातून होणारा आíथक लाभही त्याला कारण आहे. राजुरी गावातील अनेक कुटुंबे आजही हा व्यवसाय निष्ठेने करतात. सुशिक्षित मुलेही या व्यवसायात आहेत. मोठमोठय़ा कार्यक्रमांच्या तर सुपाऱ्या घेतल्या जातात व त्या दहा ते पंधरा लाखांपर्यंत असतात. या गीतांत सामाजिक, धार्मिक प्रथांचा, सामाजिक समस्यांचाही समावेश असतो. गोंधळाची प्रथा ही विधिवत पार पाडली जाते. हा विधी सुरू करण्यापूर्वी गोंधळ्याला येऊन गोंधळ घालण्याची सुपारी (म्हणजे निमंत्रण) दिले जाते. या गोंधळाच्या पूर्वरंगात गण, गवळण, आवाहन व नमन असते, तर उत्तररंगात आवाहन, गायन, सादरीकरण, आरती व भार उचलणे हे प्रकार असतात. श्रीगणेशाच्या स्तवनानंतर विविध देवतांना आवाहन केल्यानंतर सुरू झालेला गोंधळ आरतीने समाप्त होतो. गोंधळ सुरू करण्यापूर्वी देवीची परडी भरण्याची पद्धत आहे. यामध्ये देवीच्या परडीत मीठ, पीठ, तेल इत्यादी घालून सवाष्ण स्त्रीच्या हस्ते पूजा केली जाते. तुळजापूरच्या मंदिरात गोंधळ घालण्यासाठी खास मोठा कट्टा केलेला आहे. तिथे एका कोपऱ्यात गोंधळासाठी चौक मांडला जातो व संबळ आणि तुणतुणे यांसारख्या वाद्यांच्या साहाय्याने देवीची स्तुती करणारी गाणी सादर करतात आणि कथा सांगतात. हा विधी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि कार्य निर्विघ्न पार पडल्याबद्दल तिचे आभार मानण्यासाठी केला जातो.

या माहिती सोबतच श्री तुळजा भवानी,तुळजापूर गाव आणि तिच्या गूढ गोष्टी व माहित नसलेल्या प्रथा परंपरा.. या लेखमालेची इथे सांगता होते. 

 ll जगदंब जगदंब ll  

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here