तुळजापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्य सरकारने विशेष दर्जा दिला असून, यंदा हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भातील घोषणा करत, नवरात्रोत्सवाला धार्मिक-सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान मिळेल, अशी माहिती दिली.
महोत्सवाचे स्वरूप आणि कार्यक्रम
२२ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घटस्थापने पासून विजयादशमी पर्यंत हा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि देशाच्या विविध भागांतून अंदाजे ५० लाख भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या दहा दिवसांत लोकपरंपरा आणि कलांना विशेष स्थान दिले जाईल. गोंधळी गीत, भारुड, जाखडी नृत्य यांसारख्या लोककलांचे सादरीकरण होणार आहे. तसेच धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. स्थानिक परंपरा आणि आध्यात्मिकतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
ड्रोनचा लाईट शो – मुख्य आकर्षण
या महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला ३०० ड्रोनचा लाईट शो नवरात्रीच्या थीमवर आधारित असेल. या भव्य कार्यक्रमात रंगीबेरंगी प्रकाश योजना आणि संगीताच्या माध्यमातून देवीची महती प्रकट केली जाईल. त्यासोबतच स्थानिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
जे भाविक उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ आणि यूट्यूब चॅनेलवर (https://www.youtube.com/@MaharashtraTourismOfficial) थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे देश-विदेशातील भाविक आणि पर्यटक घरी बसूनही या उत्सवाचा आनंद घेऊ शकतील.
पर्यटनाला चालना
या महोत्सवाद्वारे शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्याख्याने, चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन यांसारख्या उपक्रमांचे आयोजन होणार आहे. तसेच फॅम टूर, पर्यटन विषयक कॉन्क्लेव्ह आणि फेअर इव्हेंटही होणार असून पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परिसरातील पर्यटनस्थळांचा विकास
या महोत्सवामुळे नळदुर्ग किल्ला, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर, परांडा किल्ला यांसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मदत होणार आहे.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, “तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा उत्सव नाही, तर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आणि पर्यटनाचा गौरव आहे. या निर्णयामुळे तुळजापुरासह संपूर्ण प्रदेशाचा विकास होईल.”
तुळजापूरचा नवरात्रोत्सव यंदा लोककला, आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक परंपरांचा सुंदर संगम ठरणार असून, राज्यातील पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा यांना नवी दिशा देणारा आहे.
—————————————————————————————————



