कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
विलक्षण पल्लेदार, निसर्गदत्त देणगी लाभलेला पहाडी आवाज आणि मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा जपत जनचळवळींमध्ये स्वतःला संपूर्णपणे वाहून घेणारे लोकशाहीर अमर शेख ( २० ऑक्टोबर १९१६ – २९ ऑगस्ट १९६९) हे केवळ गायक नव्हते, तर समाजाला दिशा देणारे प्रबोधक होते. आज स्मृतिदिना निमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा…
बार्शी तालुक्यातील गरीब मुस्लिम कुटुंबातून आलेल्या अमर शेख यांना सुरुवातीला बसकंडक्टर बरोबर क्लीनर व गिरणी कामगार म्हणून काम करावे लागले. गिरणी संपातील सक्रिय सहभागामुळे तुरुंगवास भोगावा लागला, तेथेच ते कम्युनिस्ट विचारांकडे वळले. पुढे कोल्हापूरला आल्यावर मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करताना त्यांना ‘अमर शेख’ हे नाव मिळाले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ति आंदोलन, तसेच चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या काळात त्यांच्या ओजस्वी गाण्यांनी जनतेला धैर्य दिले. त्यांनी आपल्या शाहिरीतून लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. त्यांच्या गीतांनी श्रमिकांच्या कष्टांना शब्द दिले आणि सामान्य जनतेला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली.
त्यांच्या लेखणीतून कलश ( १९५८), धरतीमाता ( १९६३ ) हे काव्यसंग्रह, अमरगीत ( १९५१ ) हा गीतसंग्रह, पहिला बळी ( १९५१ ) हे नाटक साकार झाले. शिवाजी महाराज, होळकर, उधमसिंग यांच्यावरचे त्यांच्या पोवाड्यांनी जनतेत लढाऊ चेतना जागवली. युगदीप व वख्त की आवाज या मासिकांचे संपादन त्यांनी केले. कलाक्षेत्रात प्रपंच, महात्मा ज्योतिबा फुले चित्रपटांत तसेच झगडा या नाटकात त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या.
उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी वाणी, लेखणी व शाहिरीचा अखंड यज्ञ केला. त्यांच्या या परंपरेचा वारसा कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यामध्येही दिसतो. लोककलांच्या संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठाने २००७ मध्ये ‘शाहीर अमर शेख अध्यासन’ स्थापन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
२९ ऑगस्ट १९६९ रोजी इंदापूर येथे त्यांचे अपघाती निधन झाले. मात्र त्यांची गाणी, त्यांची ओजस्वी शाहिरी आणि सामाजिक बांधिलकी आजही जनतेत प्रेरणादायी दीपस्तंभ ठरते. आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण त्या अद्वितीय लोककवीला, समाजशिल्पकाराला व लोकजागृतीच्या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन करूया.
—————————————————————————————————-