मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अन्न व औषध प्रशासन विभागात पूर्वी मनुष्यबळ आणि बजेट यांचा अभाव होता. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आवश्यक असलेल्या मोहिमा राबविण्यासाठी साधे बजेटही उपलब्ध नव्हते. मात्र, आता परिस्थितीत बदल झाला असून ३९४ निरीक्षकांची भरती करून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच विभागाला आवश्यक बजेट मिळवून देण्यातही यश आले आहे. यामुळे येत्या काही दिवसांत विभागाची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास गृहराज्य व अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम व्यक्त केला. पत्रकार भवन, कमिन्स सभागृहात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात कदम यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली.
गुटखा विक्री सर्रास सुरू असल्याचे मान्य करत त्यांनी त्याविरोधात विशेष मोहिमेचे आदेश दिल्याचे सांगितले. याशिवाय, विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या एका बारच्या प्रकरणावर विचारले असता, “तो बार माझा व्यवसाय नाही. जागा आमची असली तरी ती भाडेतत्वावर दिली होती आणि भाडे स्वीकारत होतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “मंत्र्यांबाबत वाद निर्माण होतात हे खरे असले तरी ती त्या वेळची परिस्थिती असते आणि विरोधक त्याचे भांडवल करतात,” असेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमांमुळे अन्न व औषध प्रशासनातील सुधारणा आणि जनतेच्या आरोग्यसुरक्षेच्या दृष्टीने सरकार अधिक सक्षम होत असल्याचे स्पष्ट झाले.
अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) यामध्ये पूर्वी मनुष्यबळ आणि आर्थिक साधनसंपत्तीचा मोठा अभाव होता. आता अन्न व औषध प्रशासन विभागाने तब्बल ३९४ निरीक्षकांची भरती केली असून, त्यांचे प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या नव्या मनुष्यबळामुळे विभागाला निरीक्षण, तपासणी, जनजागृती मोहिमा, तसेच अन्न व औषधांचे नमुने घेण्याच्या कार्यात अधिक परिणामकारकपणे काम करता येणार आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. नव्या निरीक्षकांच्या नियुक्तीमुळे राज्यभरातील अन्न व औषधविषयक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करता येईल, तसेच नागरिकांपर्यंत अन्न सुरक्षेबाबत योग्य माहिती पोहोचवणे सुलभ होईल.
विभागाने यापुढे नियमितपणे तपासण्या, कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमा राबवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे अन्न व औषधांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होणार असून गैरप्रकारांवरही कठोर कारवाई शक्य होणार आहे.
कार्यक्रमाचे स्वागत संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील यांनी केले, प्रास्तविक सरचिटणीस मंगेश फल्ले यांनी केले आणि आभार उपाध्यक्ष सागर आव्हाड यांनी मानले.