कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
लोणावळा परिसर; तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने येत्या ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिले आहेत.
लोणावळा परिसरातील एकविरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, पवना धरण या परिसरांमध्ये पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.
पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्यविक्री करणे व उघड्यावर मद्यसेवन करण्यास मनाई केली आहे. रहदारीच्या रस्त्यांवर आणि धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध करण्यात आले आहे.