अनिल जासुद : कुरुंदवाड
मे महिन्यात सलग दहा बारा दिवस झालेला मान्सून पूर्व पाऊस टोमॅटोला मारक ठरला आहे. यामुळे अकिवाट (ता.शिरोळ) येथील टोमॅटो उत्पादक शेतकर्यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. उत्पादन खर्च लाखांत अन् उत्पन्न मात्र काही हजारांतच अशी दयनीय अवस्था येथील टोमॅटो उत्पादक शेतकर्यांची झाली आहे.
गेल्या वर्षी टोमॅटो पिकांने शेतकर्यांना चांगला अर्थिक हातभार लावला होता. यामुळे शिरोळ तालुक्यातील अकिवाट परिसरातील बहुतांशी शेतकरी वर्ग यावर्षीही टोमॅटो पिकाकडे वळला आहे. येथे सुमारे ५० एकर क्षेत्रात टोमॅटो पिक घेण्यात आले आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला ज्या शेतकर्यांनी टोमॅटो रोपलागण केली होती, त्यांचे टोमॅटो मे महिन्याच्या अखेरीस तोडणीस आला होता. मात्र, मे च्या मध्यावर धुवाँधार मान्सून पूर्व पाऊस बरसला. यामुळे टोमॅटो पिकातील सरीतून पाणी साचून राहिले. अति पाण्यामुळे टोमॅटो रोपे जागेवरच पिवळी धमक पडून करपू लागली. टोमॅटो नाशवंत असल्यामुळे तोडणीस आलेला टोमॅटो येणकेण प्रकारेन शेतकर्यांना काढणे क्रमप्राप्त होते. यामुळे मजुरांच्या सहाय्याने गुडघ्याएवढ्या चिखलातूनच टोमॅटो तोडून खोपीजवळ आणला. किमान उत्पादन खर्च तरी निघावा म्हणून आसपासच्या बाजारपेठेत पाठवला. मात्र बाजार सौद्यात ही म्हणावा तसा दर मिळाला नाही.
मे महिन्यात झालेल्या पावसाने पिकातील ओल अजून कायम आहे. यातच जून मध्येही पावसाच्या वारंवार मोठ्या सरी कोसळत आहेत. अतिपाण्यामुळे टोमॅटो उत्पादना वरही मोठा परिणाम झाला आहे. टोमॅटो वेल पिवळी पडत आहेत , टोमॅटोचे फळ मोठे न होता लहान लहान गोळी स्वरुपात लागत आहेत. या गोळी टोमॅटोला बाजारपेठेत चांगला भाव मिळत नाही. तसेच साधारणतः टोमॅटो तोडणीस आल्यानंतर तीन दिवसातून एकदा टोमॅटो तोडणीस येतो. असा बहर संपेपर्यंत दहा ते पंधरा टोमॅटोच्या तोडण्या होतात. मात्र, यावर्षीच्या मान्सून पूर्व पावसाचे पाणी पंधरा दिवस सरीतून साचून राहिले.
अतिपाण्यामुळे दोन ते तीन तोडणीतच टोमॅटोचा सर्व बहर संपून गेला आहे. उत्पादन अतिशय कमी निघाल्यामुळे अकिवाट परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकर्यांना लाखोंचा अर्थिक फटका बसला आहे. तर काही शेतकर्यांनी टोमॅटोला लाखोंचा उत्पादन खर्च घालुनही उत्पन्न मिळणार नसल्याने शिवारात जसा टोमँटो आहे तसा सोडुन दिला आहे.अशा शेतकर्यांना तर एकरी दोन लाखांपेक्षाही जास्त अर्थिक फटका बसला आहे.
शासनस्तरावरुन अकिवाट परिसरातील नुकसानग्रस्त टोमटो अशा शेतकर्यांना तर एकरी दोन लाखांपेक्षाही जास्त अर्थिक फटका बसला आहे. पिकाचा पंचनामा करुन त्याची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी येथील सर्व टोमॅटो उत्पादक शेतकर्यांनी केली आहे.
टोमॅटो चे पिक घेताना शिवार तयार करण्यापासून ते टोमॅटो तोडणीस येईपर्यंत मशागत, विविध खते, ड्रीप खते, रोपे, तार-काठी, सुतळी बांधणे, औषध फवारणी, मजूर पगार अशाप्रकारे एकरी दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला आहे. मात्र, मे मध्ये झालेल्या मान्सून पूर्व पावसाचा टोमॅटो उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अतिपाण्यामुळे रोपे जागेवर करपून गेली आहेत. फळ कमी प्रमाणात लागत आहेत. यामुळे खर्च लाखांत करुनही उत्पन्न मात्र काही हजारांतच मिळाले आहे. झालेल्या नुकसानीची शासनाकडून दखल घेऊन टोमॅटो उत्पादक शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी – श्री.दत्तु रामू गायकवाड, टोमॅटो उत्पादक शेतकरी, अकिवाट, ता.शिरोळ
मी तर यावर्षी एकरी ४० हजार रुपये भाडेपट्टी देऊन दोन एकर टोमॅटो पिक घेतले आहे. यातील एक एकर टोमॅटो अतिपाण्यामुळे खराब झाला आहे . यामुळे टोमॅटो आहे त्या स्थितीत शिवारात तसाच सोडून दिला आहे. यामुळे पिकाला घातलेले दोन लाख रुपये व भाडेपट्टी ४० हजार असा अडीच लाखांचा अर्थिक फटका मला बसला आहे. – श्री.अनिकेत गायकवाड, अकिवाट (ता.शिरोळ)
————————————————————————————————-