Private vehicles and ST buses of Ganesh devotees will be exempted from toll charges on the Mumbai-Bengaluru National Highway, Mumbai-Goa National Highway, as well as at toll plazas under the jurisdiction of the Public Works Department and the Maharashtra State Road Development Corporation.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवरून गणेशभक्तांच्या खासगी वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.
यासाठी शासनाने ‘गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन’ या नावाचे विशेष टोलमाफी पास सुरू केले आहेत. या पासवर वाहन क्रमांक व मालकाची माहिती नोंदवली जाणार असून, ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभाग समन्वय साधून पासचे वाटप करणार आहेत. नागरिकांना वेळेत सुविधा मिळावी यासाठी जाहिरात व सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी आणि सुरक्षिततेचा विचार करून मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर जड वाहनांना वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १५५ नुसार १६ टनांपेक्षा जास्त वजनक्षमता असलेली अवजड वाहने, ट्रक, मल्टी-अॅक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांना ठराविक कालावधीत प्रवास करता येणार नाही.
२३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ पासून ते २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपर्यंत जड वाहनांना पूर्ण बंदी असेल.
५ व ७ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन तसेच गौरी गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठी – ३१ ऑगस्ट व २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ या वेळेत बंदी राहील.
११ दिवसांचे गणपती विसर्जन व परतीचा प्रवास – ६ सप्टेंबर सकाळी ८ ते ७ सप्टेंबर रात्री ८ या कालावधीत जड वाहनांना बंदी राहील.
या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.