तिटवे : प्रसारमाध्यम न्यूज
राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील चक्रेश्वर मंदिर भक्तीमय वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते आणि श्रावण सोमवार आणि अमावस्या या दिवशी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी येथे प्राचीन शिवमंदिरांची परिक्रमा करण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात. महादेवाचे दर्शन घेताना भक्तिमय वातावरण भरून राहते.

चक्रेश्वरवाडीला ‘ प्रति करवीर ‘ असेही म्हणतात, कारण या मंदिरात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराप्रमाणेच आहे. मंदिराच्या परिसरात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत, जसे की सप्तमातृका, रंकभैरव, भैरवी, कार्तिकस्वामी, महाविष्णू, महिषासूर मर्दिनी आणि नरसिंह. मंदिराच्या उजव्या कोपऱ्यात भैरवाची मूर्ती आहे, ज्याला ग्रामस्थ खोकलोबा म्हणतात.

चक्रेश्वर मंदिराला एक वेगळे महत्व आहे. करवीर क्षेत्राची प्रदक्षिणा करताना, चक्रेश्वराचे दर्शन घेणे महत्वाचे मानले जाते. मंदिराच्या पूर्वेकडील टेकडीवर एक शिवमंदिर आहे, ज्याच्या परिसरात चक्राकार पाषाण आढळतात, ज्यावर ‘ओम’ आणि ‘कंकाळ’ अशी चिन्हे आहेत. या पाषाणांमुळेच या गावाला चक्रेश्वरवाडी असे नाव पडले असावे.
येथील शिलावर्तुळावर उभे राहिल्यास, संपूर्ण अवकाश दृष्टीपथात येते आणि ‘ब्रम्हशांती’चा अनुभव मिळतो, असे सांगितले जाते.

दगडांवरील अर्धचक्राकार खुणांचा शोध
मंदिराकडे परतताना टेकडीच्या उतारावर काही कोरीव खुणा असलेले दगड आढळले. जवळून पाहिल्यावर त्या अर्धचक्राकार, पूर्ण चक्रासारख्या आणि विविध आकृत्यांमध्ये कोरलेल्या असल्याचे दिसले. अभ्यासकांच्या पुस्तकांमध्ये प्रसिद्ध असलेले हेच दगड असल्याची खात्री पटली. स्थानिकांच्या मते, ही शिलावर्तुळाकार टेकडी अश्मयुगीन दफनभूमी असण्याची शक्यता आहे. याच भागात प्राचीन शिवलिंगाचेही अवशेष सापडले आहेत.
चक्रेश्वरवाडी – श्रद्धा आणि इतिहासाचा संगम
चक्रेश्वरवाडीपासून अडीच किलोमीटर अंतरावर तापसा लेणी आहेत. श्रावण सोमवारी महादेवाच्या दर्शनासह टेकडीवरील गूढ दगड, अश्मयुगीन अवशेष आणि तापसा लेण्यांचा शोध हा भाविक आणि पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव ठरतो. चक्रेश्वरवाडी हे स्थळ आता धार्मिक पर्यटनाबरोबरच इतिहास व पुरातत्त्वाच्या अभ्यासकांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनत आहे.



